अजित पवारांचा 'पीए' असल्याचा बनाव; सरकारी नोकरीच्या नावाखाली 21 लाखांचा गंडा!
मीरा-भाईंदरमध्ये सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोन महिलांची तब्बल 21 लाख 46 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए असल्याची बतावणी करणाऱ्या तुलसीदास जाधव याला पोलिसांनी सोलापुरातून अटक केली आहे. आरोपीविरोधात महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अशाच प्रकारचे 11 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

भाईंदर : सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका कथित ठगाचा मीरा-भाईंदर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्वीय सहाय्यक (पीए) असल्याची बतावणी करून दोन महिलांना सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत तब्बल 21 लाख 46 हजार रुपये उकळल्याचा आरोप 40 वर्षीय तुलसीदास जाधव याच्यावर आहे. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला सोलापुरातून अटक केली आहे.
अजित पवारांचा पीए असल्याचा दावा करून संपादन केला विश्वास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2025 मध्ये तुलसीदास जाधव याने तक्रारदार महिलेच्या वडिलांशी संपर्क साधला होता. आपण अजित पवार यांचा पीए असून एका शिक्षक संघटनेचे कार्यकर्ते असल्याचा दावा त्याने केला. तसेच, राजकीय क्षेत्रातील मोठ्या नेत्यांशी आपले जवळचे संबंध असून यापूर्वी अनेकांना सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्याचे सांगत त्याने संबंधित कुटुंबाचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर तक्रारदार महिला आणि तिच्या मैत्रिणीला सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन आरोपीने दिले. या नोकरीसाठी त्याने विविध कारणे सांगून एकूण 21 लाख 46 हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
लाखो रुपये घेतल्यानंतर मोबाईल बंद; महिलांची पोलिसांत धाव
आरोपीच्या आश्वासनावर विश्वास ठेवून संबंधितांनी मोठी रक्कम दिली. मात्र, अनेक दिवस उलटूनही दोघींना सरकारी नोकरी मिळाली नाही. पैसे परत मागितल्यानंतर आरोपीने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. अखेर त्याने आपला मोबाईल बंद करून तक्रारदारांशी संपर्क तोडल्याचे पोलिसांनी सांगितले.
नोकरीही मिळाली नाही आणि दिलेले पैसेही परत मिळाले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितांनी भाईंदर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तुलसीदास जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपीचा शोध घेत त्याला सोलापूर येथून अटक करण्यात आली.
मोबाईलमध्ये बड्या राजकीय नेत्यांसोबतचे फोटो
या प्रकरणात तपासादरम्यान पोलिसांना आणखी काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये महाराष्ट्रातील विविध राजकीय नेत्यांसोबत काढलेले फोटो आढळून आल्याचे पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी सांगितले.
राजकीय नेत्यांसोबतच्या ओळखींचा प्रभाव दाखवून आरोपीने नागरिकांचा विश्वास संपादन केला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, संबंधित राजकीय नेत्यांचा या कथित फसवणुकीशी कोणताही संबंध असल्याचे तपासात सिद्ध झालेले नाही.
महाराष्ट्रात 11 गुन्हे; आणखी पीडित असण्याची शक्यता
पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुलसीदास जाधव याच्याविरोधात महाराष्ट्रातील 11 ठिकाणी अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आरोपीने आणखी अनेकांची फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.
आरोपीने किती लोकांकडून पैसे घेतले, त्या पैशांचा वापर कुठे केला आणि या प्रकारात त्याचे आणखी काही साथीदार आहेत का, या बाबींचा पुढील तपासात शोध घेतला जाणार आहे.
दरम्यान, तुलसीदास जाधव याने सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली इतर कोणाची आर्थिक फसवणूक केली असल्यास संबंधितांनी पुढे येऊन भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार किंवा जबाब नोंदवावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.