मोशी कचरा डेपो दुर्घटना : ढिगाऱ्यातून एकाचा मृतदेह बाहेर; भावेश वाणी गंभीर जखमी, बचावकार्य सुरू
Summary मोशी कचरा डेपो परिसरातील 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पासाठी वापरण्यात येणारी G+2 आरसीसी इमारत कोसळून एकाचा मृत्यू झाला असून गंभीर जखमी भावेश वाणी यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पिंपरी-चिंचवड : मोशी कचरा डेपो परिसरातील 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाच्या कार्यालय व कॅन्टीनसाठी वापरण्यात येणारी ग्राउंड प्लस दोन मजली (G+2) आरसीसी इमारत कोसळल्याच्या भीषण दुर्घटनेत पहिली जीवितहानी समोर आली आहे. बचाव पथकाने ढिगाऱ्यातून एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि 'पोस्टमॉर्टम' येथील पिंपरी वायसीएम (YCM) रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या भावेश वाणी यांना तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बुधवारी दुपारच्या जेवणाच्या सुटीदरम्यान ही दुर्घटना घडली. त्या वेळी कार्यालय आणि कॅन्टीनमध्ये कर्मचारी उपस्थित असल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली. सुरुवातीच्या टप्प्यात ढिगाऱ्याखालून मदतीसाठी हाका आणि काही कर्मचाऱ्यांचे आवाज ऐकू येत असल्याने बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. वेळेशी स्पर्धा करत ढिगारा हटविण्याचे काम सुरू करण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा मोठा ढिगारा सरकून इमारतीवर कोसळला किंवा इमारतीचा पाया कमकुवत झाल्याने संपूर्ण रचना खचली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून तांत्रिक तपासणीनंतरच याबाबत अंतिम निष्कर्ष काढला जाणार आहे.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF/PDRF), पोलीस, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग तसेच इतर आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. क्रेन, जेसीबी, पोकलेन, हायड्रॉलिक कटर, काँक्रीट ब्रेकर आणि अत्याधुनिक शोध उपकरणांच्या साहाय्याने ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी प्रत्येक थर काळजीपूर्वक हटविला जात असून, बचावकार्याला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर इमारतीच्या बांधकामाची गुणवत्ता, सुरक्षाविषयक उपाययोजना, पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि कचरा डेपोतील संरचनात्मक सुरक्षिततेची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.