मोशी कचरा डेपो परिसरात भीषण दुर्घटना; 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाची इमारत कोसळली
मोशी कचरा डेपो परिसरात 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाची इमारत कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. ढिगाऱ्याखाली १४ ते १५ जण अडकल्याची भीती असून बचावकार्य सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील मोशी भागातून अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. मोशी कचरा डेपो शेजारील 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाची तीन मजली प्रशासकीय इमारत कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा मोठा डोंगर खचून इमारतीवर कोसळल्याचे प्राथमिक अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दुर्घटनेच्या वेळी इमारतीत अनेक कर्मचारी उपस्थित होते. ढिगाऱ्याखाली १४ ते १५ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर काही कर्मचाऱ्यांचे आवाज ऐकू आल्याने ते जिवंत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या मृत्यूची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशमन दल, पोलीस, NDRF आणि PDRF पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत. ढिगारा उपसण्याचे आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. D Y Patil हॉस्पिटलची रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथकही घटनास्थळी तैनात असल्याची माहिती आहे.
ही दुर्घटना मोशी कचरा डेपो परिसरातील ग्राउंड फ्लोअर प्लस दोन मजली (G+2) आरसीसी संरचनेतील कॅन्टीन व कार्यालयाच्या इमारतीशी संबंधित असल्याचेही सांगितले जात आहे. मातीचा पाया खचल्यामुळे ही इमारत कोसळल्याचे प्राथमिक कारण पुढे येत आहे.
घटनेच्या वेळी दुपारच्या जेवणाची वेळ असल्याने अनेक कर्मचारी इमारतीत उपस्थित असण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. अधिकृत आकडेवारी अद्याप स्पष्ट झालेली नसली तरी बचाव पथकांकडून शोधमोहीम सुरूच असून, परिसरात तणावाचे वातावरण आहे
.jpeg)