“आमदार-खासदार फुटले तेव्हा काही वाटलं नाही, पण MPSC चा पेपर फुटला अन् आमचं आभाळ फाटलं”; राज ठाकरेंसामोर विद्यार्थ्याचं तुफान भाषण

पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थी आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी कोल्हापूरच्या विवेकानंद पाटील या विद्यार्थ्याने “आमदार-खासदार फुटले तेव्हा काही वाटलं नाही, पण MPSC चा पेपर फुटला आणि आमचं आभाळ फाटलं” असे म्हणत संताप व्यक्त केला. राज ठाकरे यांनीही विद्यार्थ्यांच्या रागात सामील असल्याचे सांगत नोकऱ्या आणि परीक्षा प्रक्रियेबाबत सरकारवर टीका केली.

Vivekanand_Patil

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील गैरप्रकार आणि आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. शहरातील वेगवेगळ्या तीन ठिकाणी विद्यार्थी आंदोलन करत असून, आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली. मात्र यावेळी कोल्हापूरचा विद्यार्थी विवेकानंद पाटील याने केलेल्या भाषणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

“आमदार फुटले, खासदार फुटले, पक्ष फुटला तेव्हा आम्हाला काही वाटलं नाही; पण MPSC चा पेपर फुटला आणि आमचं आभाळ फाटलं,” असे म्हणत विवेकानंद पाटील याने विद्यार्थ्यांच्या भावना राज ठाकरेंसामोर मांडल्या.

पेपर फुटला आणि आमचं आभाळ फाटलं...

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बोलताना विवेकानंद पाटील म्हणाला की, पेपरफुटीमुळे महाराष्ट्रातील मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. अन्न व औषध प्रशासनासह ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षांच्या पेपरबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून विविध परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता असल्याचे त्याने सांगितले.

“या लोकांनी आमदार फोडले, खासदार फोडले, पक्ष फोडले तेव्हा आम्हाला काही वाटलं नाही. पण MPSC चा पेपर फुटला आणि आमचं आभाळ फाटलं. म्हणून आम्ही राज ठाकरेंना साद घातली. आता आम्हाला न्याय मिळाला पाहिजे,” असे विवेकानंद पाटील म्हणाला.

“मी तुमच्या रागात सामील व्हायला आलोय” – राज ठाकरे

विद्यार्थ्यांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. “मी इथे तुम्हाला केवळ पाठिंबा द्यायला आलेलो नाही, तर तुमच्या रागात सामील व्हायला आलोय. हा राग तात्पुरता राहता कामा नये,” असे ते म्हणाले.

सरकारी व्यवस्थेमधील विलंबामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे वाया जात असल्याचा मुद्दाही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. “तुमच्याकडे पेपर फुटत आहेत, आमच्याकडे मतं फुटत आहेत. या सगळ्या प्रक्रियेत वर्षामागून वर्षे निघून जात आहेत,” असे त्यांनी म्हटले.

“महाराष्ट्रातील नोकऱ्या मराठी मुलांनाच मिळाल्या पाहिजेत”

राज ठाकरे यांनी राज्यातील रोजगाराच्या मुद्द्यावरही भूमिका मांडली. सरकारकडून मोठ्या प्रमाणात पदभरतीच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.

“महाराष्ट्रातील ज्या काही नोकऱ्या आहेत त्या मराठी मुला-मुलींनाच मिळाल्या पाहिजेत. सरकारी नोकऱ्या कमी होत आहेत आणि अनेक क्षेत्रांचे खासगीकरण सुरू आहे. खासगी क्षेत्रात आरक्षणही नाही,” असे राज ठाकरे म्हणाले.

विद्यार्थ्यांनी आपला दबाव कायम ठेवावा आणि मूलभूत प्रश्नांवर आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Inline Article Ad 728x90