लग्नाचे आमिष दाखवून 3 वर्षे अत्याचाराचा आरोप; शिंदे गटाशी संबंधित युवा नेता शिवम दुबे अटकेत

मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली एमआयडीसी पोलिसांनी शिवम दुबे उर्फ चोंग्या याला अटक केली आहे. पीडितेकडून लाखो रुपये आणि महागडी कार घेतल्याचाही आरोप असून, आरोपी इतर तरुणींनाही अशाच प्रकारे फसवत होता का, याचा पोलीस तपास सुरू आहे.

Rape_Case

मुंबई : अंधेरी पूर्व परिसरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर सलग तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली एमआयडीसी पोलिसांनी शिवम दुबे उर्फ चोंग्या याला अटक केली आहे. शिवम दुबे हा शिंदे गटाशी संबंधित युवा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत असून, या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, अंधेरी पूर्वेतील महाकाली परिसरात राहणाऱ्या शिवम दुबेने पीडित तरुणीशी जवळीक निर्माण केली. त्यानंतर लग्नाचे आश्वासन देत गेल्या तीन वर्षांत तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

इतकेच नाही तर या कालावधीत आरोपीने तरुणीकडून लाखो रुपये आणि एक महागडी कार घेतल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपी उत्तर प्रदेशात दुसऱ्या तरुणीशी लग्न करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पीडितेला मिळाल्यानंतर तिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करत शिवम दुबे याला अटक केली.

शिवम दुबे हा शिंदे गटाशी संबंधित माजी नगरसेवक कमलेश राय आणि नगरसेवक रितेश राय यांच्या जवळचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे वृत्त असून, 2023 मध्ये त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, पीडितेने पोलिसांत तक्रार देऊ नये यासाठी आपल्यावर दबाव आणण्यात आल्याचा आरोप केला आहे. या आरोपांची स्वतंत्र पडताळणी आणि तपास पोलीस करत आहेत.

सध्या शिवम दुबे एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात असून, त्याने याच पद्धतीने आणखी कोणत्या तरुणींना फसवले आहे का, तसेच आर्थिक व्यवहार आणि इतर आरोपांमागील तथ्य काय आहे, याचा तपास सुरू आहे.

Inline Article Ad 728x90