मुंबईत धमकीच्या ई-मेलचा धडाका! बिग बींच्या 'जलसा'पासून शाळांपर्यंत बॉम्बस्फोटाचा इशारा
मुंबईत एकाच दिवशी अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमक्या ई-मेलद्वारे देण्यात आल्या आहेत. अमिताभ बच्चन यांचा 'जलसा' बंगला, महापौर रितू तावडे यांचे कार्यालय, दादरमधील शाळा आणि दिलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टला लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून धमकीच्या ई-मेलचा तपास सुरू आहे.

मुंबई : मुंबईत एकापाठोपाठ एक आलेल्या बॉम्बस्फोटाच्या धमकीच्या ई-मेलमुळे खळबळ उडाली आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा जुहू येथील 'जलसा' बंगला, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे कार्यालय, दादरमधील काही शाळा आणि प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांच्या आगामी कॉन्सर्टला लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेनंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यावर हल्ल्याची धमकी
धमकीच्या ई-मेलमध्ये अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील 'जलसा' बंगल्यावर 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबरदरम्यान ग्रेनेड हल्ला करण्याचा उल्लेख आहे. तसेच 27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर होणाऱ्या दिलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे.
शाळांना धमकी; विद्यार्थ्यांना घरी पाठवले
दादरमधील तीन ते चार शाळांसह नवी मुंबईतील ऐरोली येथील विब्ग्योर शाळेलाही धमकी देण्यात आल्याचे वृत्त आहे. एका शाळेत दुपारी 1 वाजून 11 मिनिटांनी स्फोट घडवण्याचा उल्लेख ई-मेलमध्ये करण्यात आला होता. खबरदारी म्हणून दादरमधील संबंधित शाळांना सुट्टी देऊन विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले. पोलिसांनी परिसरात तपासणी केली.
महापौर रितू तावडे यांना पुन्हा धमकी
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना पुन्हा एकदा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला आहे. महापौर कार्यालय दुपारी 3 वाजून 11 मिनिटांनी बॉम्बने उडवण्याचा इशारा देण्यात आला होता. तावडे यांना धमकी मिळण्याची ही तिसरी वेळ असल्याचे वृत्त आहे. वारंवार येणाऱ्या अशा धमक्यांमुळे महापालिका प्रशासनाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
धमकीच्या ई-मेलमागे कोण? पोलिसांचा तपास सुरू
धमकीच्या ई-मेलमध्ये खलिस्तानशी संबंधित संघटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, ई-मेल पाठवणाऱ्याची ओळख किंवा संबंधित संघटनांचा प्रत्यक्ष सहभाग अद्याप निश्चित झालेला नाही. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. धमकीचा स्रोत आणि त्यामागील उद्देश शोधण्यासाठी तपास सुरू आहे.