मुंबईत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला? संतापलेल्या महिलांचा कोयता घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा!

मुंबईत मासळीच्या टोपल्या घेऊन प्रवास करणाऱ्या कोळी महिलांना बेस्ट बसमध्ये चढू दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. बसचालक बस थांबवत नसल्याने महिलांना शेकडो रुपये खर्च करून टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कोळी महिलांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

best-bus-fisherwomen-issue-mumbai-koli-women.

मुंबई : मुंबईची मूळ ओळख असलेल्या कोळी समाजातील महिलांनाच आता मुंबईत प्रवासासाठी संघर्ष करावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मासळीच्या टोपल्या पाहून बेस्टचे चालक बस थांबवत नाहीत, तसेच बसमध्ये चढण्यास मज्जाव केला जात असल्याचा आरोप कोळी महिलांनी केला आहे. या प्रकारामुळे संतापलेल्या महिलांनी बेस्ट प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

कोळी महिलांच्या म्हणण्यानुसार, मासळी विक्रीसाठी त्यांना दररोज खारदांडा, मालाड, कुलाबा आणि क्रॉफर्ड मार्केट परिसरात प्रवास करावा लागतो. मात्र, मासळीचा वास येत असल्याचे कारण देत काही रिक्षाचालकही त्यांना प्रवास नाकारतात. बेस्ट बसचालक मासळीच्या टोपल्या पाहून बस थांबवत नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे. त्यामुळे विशेषतः वृद्ध महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

५० रुपयांच्या प्रवासासाठी मोजावे लागतात ६०० ते ८०० रुपये!

एका कोळी महिलेने सांगितले की, कुलाबा ते वांद्रे प्रवासासाठी बेस्ट बसचे तिकीट आणि सामानाचे भाडे मिळून सुमारे ५० रुपये खर्च होतात. मात्र, बस न थांबल्यास टॅक्सीसाठी ६०० ते ८०० रुपये मोजावे लागतात. आधीच मासळी विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंब चालवणाऱ्या महिलांना हा अतिरिक्त खर्च परवडत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

'कोयता हातात घेऊन रस्त्यावर उतरू' – कोळी महिलांचा इशारा

वारंवार होणाऱ्या कथित अडवणुकीमुळे कोळी महिलांचा संताप अनावर झाला आहे. यापुढे बस थांबवली नाही किंवा बसमध्ये प्रवेश नाकारला, तर हातात कोयता घेऊन रस्त्यावर उभे राहू, असा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे नगरसेवक चिंतामणी निवाटे यांनीही या प्रकरणात बेस्ट प्रशासनाला इशारा दिला आहे. कोळी महिलांवरील अन्याय थांबला नाही, तर महिलांना सोबत घेऊन बेस्टविरोधात मोर्चा काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

पहाटे चार वाजल्यापासून मासळी विक्रीसाठी धडपडणाऱ्या महिलांना सार्वजनिक वाहतुकीत अडचणी येत असल्याने त्यांच्या उपजीविकेवरही परिणाम होत असल्याचे निवाटे यांनी म्हटले आहे.

मुंबईची ओळख जपणाऱ्या कोळी महिलांनाच सार्वजनिक वाहतुकीसाठी संघर्ष करावा लागत असल्याने आता बेस्ट प्रशासन या तक्रारींवर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Inline Article Ad 728x90