नीट आंदोलनात धक्कादायक प्रकार! विद्यार्थ्यांना खोट्या ड्रग्ज गुन्ह्याची धमकी

मुंबईतील नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची बदली करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राजकीय नेत्यांनीही या घटनेचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Police Threats Students

मुंबई : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ मुंबईत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंदोलनात ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या वाहनातच अंमली पदार्थांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे मुंबई पोलिसांच्या वर्तनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर तातडीने प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक पोलीस कर्मचारी आंदोलनात सहभागी असलेल्या तरुणाला, “पुन्हा दिसलास तर 50 ग्रॅमची पावडर टाकेन,” अशी धमकी देताना ऐकू येत आहे. या वक्तव्यामुळे विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप होत असून, या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पोलीस कर्मचारी सायन पोलीस ठाण्यात चालक म्हणून कार्यरत होता. व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याची तात्काळ बदली करण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

काही वृत्तांनुसार, संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचे नाव पवन सांगळे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या प्रकरणाबाबत अधिकृत चौकशी सुरू असून चौकशी अहवालानंतर पुढील शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट च्या खासदार सुप्रिया सुळे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. विद्यार्थ्यांना अशा प्रकारे धमकावणे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे सांगत संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सध्या या व्हायरल व्हिडिओची आणि संबंधित घटनेची चौकशी सुरू असून, चौकशीनंतर पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Inline Article Ad 728x90