MPSC आंदोलनावर मुरलीधर मोहोळांचा रोहित पवारांना सल्ला; ‘विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करू नका’

पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न सोडवणारा उपाय नसल्याचे सांगत त्यांनी रोहित पवारांनी विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करू नये आणि आंदोलन स्थगित करण्याचा विचार करावा, असे म्हटले आहे.

murlidhar-mohol

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटी, रखडलेल्या भरती प्रक्रिया आणि विविध गैरकारभारांविरोधात पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर संवाद साधावा आणि त्यांना न्याय देणे ही सरकारची नैतिक जबाबदारी असल्याची भूमिका पुढे आली आहे.

या आंदोलनावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाष्य करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे सांगितले. मात्र MPSC अध्यक्षांचा राजीनामा हीच विद्यार्थ्यांच्या भवितव्याची हमी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोहोळ म्हणाले की, विद्यार्थ्यांना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली असून त्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली आहे. MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या विषयावर संबंधित घटनात्मक प्रक्रिया असल्याचेही त्यांनी सांगितले.

परीक्षा ऑनलाइन घ्यायची की ऑफलाइन, याबाबत विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊनच निर्णय केला जाईल आणि विद्यार्थ्यांना त्रास होईल अशी प्रक्रिया राबवली जाणार नाही, असा विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आंदोलनामागे राजकीय हेतू आहे का, असा सवालही मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित केला. आंदोलनस्थळी विविध राजकीय पक्षांचे नेते येत असून मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर टीका केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

“आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांचे भविष्य होऊ शकत नाही. रोहित पवारांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करावा. विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करू नये आणि आंदोलन स्थगित करावे,” असा सल्ला मोहोळ यांनी दिला.

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप तीव्र होत असून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार पुढे नेमका कोणता निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.

Inline Article Ad 728x90