डान्स क्लासला जाण्यावरून वाद, पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू; पोस्टमार्टम रिपोर्टने उलगडलं धक्कादायक सत्य
नागपुरात डान्स क्लासला जाण्याच्या मुद्द्यावरून पती-पत्नीमध्ये झालेला वाद हिंसक झाला. पतीने पत्नीला मारहाण केल्याचा आरोप असून, गंभीर अंतर्गत दुखापतींमुळे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद झाल्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्टमुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आणि पोलिसांनी पतीला अटक केली.

नागपूर : डान्स क्लासला जाण्यावरून झालेला कौटुंबिक वाद एका महिलेच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना नागपुरात समोर आली आहे. 38 वर्षीय यामिनी कृष्ण लाल यादव यांचा गंभीर दुखापतींमुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात तिचा पती कृष्ण लाल यादव याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं त्या रात्री काय घडलं? सुरुवातीला या प्रकरणाची नोंद अपघाती मृत्यू म्हणून का करण्यात आली? आणि पोस्टमार्टम रिपोर्टनंतर पोलिसांना असा कोणता धागा मिळाला की तपासाची दिशा बदलली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्ण लाल कामावरून घरी परतल्यानंतर त्याने पत्नी यामिनीला स्वतःसाठी आणि मुलांसाठी जेवण बनवण्यास सांगितले. मात्र, यामिनी सोसायटीमध्ये सुरू असलेल्या डान्स क्लासला जाण्याच्या तयारीत होती. तिने स्वयंपाक करण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला.
हा वाद पुढे वाढला आणि कृष्ण लालने यामिनीला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यावेळी कृष्ण लाल मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही मारहाण त्यांच्या दोन लहान मुलांसमोर झाल्याचा आरोप आहे.
मारहाणीनंतर यामिनीच्या मानेत आणि पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. प्रकृती बिघडत असल्याने तिने पतीकडे पेनकिलर आणण्यास सांगितले. त्यानंतर कृष्ण लाल औषध आणण्यासाठी मेडिकल दुकानात गेला. मात्र, दुकान बंद असल्याने तो औषध न घेताच घरी परतला.
दरम्यान, यामिनीची प्रकृती आणखी खालावत गेली. तिच्या पोटावर सूज आली आणि दुखापतींचा त्रास वाढला. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.
इथूनच या प्रकरणात संशयाची सुरुवात झाली.
सुरुवातीला यामिनीच्या मृत्यूची नोंद अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेगळे वळण मिळाले. अहवालात यामिनीच्या शरीरावर गंभीर दुखापती झाल्याचे समोर आले. मानेचे हाड मोडल्याचे तसेच आतड्यांना गंभीर दुखापत झाल्याचे नमूद असल्याची माहिती आहे.
पोस्टमार्टम रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी कृष्ण लालची चौकशी केली. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे दोन लहान मुलांच्या डोक्यावरून आईचं छत्र हरपलं आहे. डान्स क्लासला जाण्यावरून सुरू झालेला वाद इतका टोकाला कसा पोहोचला, याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.