नागपुरात प्रेमत्रिकोणातून रक्तरंजित संघर्ष; दोन गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तरुणांमध्ये हाणामारी, एकाचा मृत्यू

नागपुरातील नरेंद्रनगर परिसरात प्रेमत्रिकोणातून दोन गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तरुणांमध्ये रस्त्यावर जोरदार हाणामारी झाली. या संघर्षात गौरव राऊतने गौरव रगडेच्या छातीत चाकूने वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी रगडेला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

nagapur

नागपूर : नागपूरच्या नरेंद्रनगर परिसरातील सुंदरबन भागात प्रेमत्रिकोणातून झालेल्या वादाचे पर्यवसान एका तरुणाच्या हत्येत झाले. कुख्यात हिस्ट्रीशीटर गौरव रगडे याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गौरव प्रभाकर राऊत आणि दीपक वासनिक यांच्याविरोधात कारवाई सुरू केली आहे.

गौरव रगडे याच्याविरोधात अजनी पोलीस ठाण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा यांसह सुमारे नऊ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

एकाच तरुणीशी दोघांचे प्रेमसंबंध असल्याचा संशय

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, गौरव रगडे याचे मागील दोन वर्षांपासून सुंदरबन परिसरातील सपना नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्याच तरुणीशी गौरव राऊत याचीही मैत्री होती. पुढे या मैत्रीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. गौरव राऊत हा यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसचा रहिवासी असून, सपनासाठी तो नागपुरात आला होता. त्याने नरेंद्रनगर परिसरात सपनासोबत ‘क्लाऊड किचन’ सुरू केले होते. याच काळात रगडे आणि राऊत यांच्यात वाद निर्माण झाल्याची माहिती आहे.

घरात सपना दिसल्याने वाद विकोपाला

गुरुवारी गौरव राऊतच्या नरेंद्रनगर येथील घरी पार्टी सुरू होती. सपना तिथे असल्याची माहिती गौरव रगडेला मिळाल्यानंतर तो तेथे पोहोचला. घराचा दरवाजा बंद असल्याने त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा न उघडल्याने त्याने खिडकीच्या काचा फोडल्या. खिडकीतून पाहिल्यानंतर त्याला सपना गौरव राऊतसोबत असल्याचे दिसल्याने वाद आणखी चिघळला. त्यानंतर गौरव राऊतने तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांमध्ये रस्त्यावरच हाणामारी सुरू झाली.

अर्धा तास रस्त्यावर सुरू होती झुंज

पोलिसांच्या माहितीनुसार, गौरव रगडे आणि गौरव राऊत यांच्यात जवळपास अर्धा तास झटापट सुरू होती. अजनी परिसरातून सुरू झालेली ही हाणामारी बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीपर्यंत पोहोचली. यावेळी दोघांमध्ये जोरदार मारामारी झाली. त्यानंतर गौरव राऊतने गौरव रगडेच्या कमरेजवळील बेल्टला लावलेला चाकू काढून त्याच्या छातीत वार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गौरव राऊतला ताब्यात घेतले. गंभीर जखमी झालेल्या गौरव रगडेला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दोन आठवड्यांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता

या प्रकरणातील आरोपी गौरव राऊत हा काही दिवसांपूर्वीच कारागृहातून जामिनावर बाहेर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सध्या पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू असून, प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद, हत्येचा नेमका घटनाक्रम आणि या प्रकरणातील इतर व्यक्तींची भूमिका याचा तपास केला जात आहे.

Inline Article Ad 728x90