बुटात मोबाईल लपवून परीक्षेत प्रवेश; प्रश्नपत्रिका मिळताच Google वर उत्तरांचा शोध, नाशिकमध्ये ‘हायटेक कॉपी’चा धक्कादायक प्रकार
मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई पदाच्या भरती परीक्षेत नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुटात मोबाइल लपवून परीक्षा केंद्रात पोहोचलेल्या परीक्षार्थीने प्रश्नपत्रिका मिळताच Google वर उत्तरं शोधण्यास सुरुवात केली. पर्यवेक्षकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार रंगेहात पकडला गेला असून, याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ai Generated
नाशिक : मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई पदाच्या भरती परीक्षेदरम्यान नाशिकमध्ये परीक्षेतील गैरप्रकाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना सर्व नियम झुगारून एका परीक्षार्थीने मोबाइल फोन चक्क बुटात लपवून आणल्याचा आरोप आहे. मात्र, प्रश्नपत्रिका हातात पडताच त्याने केलेली एक कृती पर्यवेक्षकांच्या लक्षात आली आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
नाशिकच्या कॉलेज रोडवरील एस.एम.आर.के. महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई पदासाठी परीक्षा सुरू असताना नाशिकरोड येथील सह दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तराचे सहायक अधीक्षक तुषार वडघुले आणि प्राध्यापक सौरभ देशपांडे हे पर्यवेक्षक म्हणून कर्तव्यावर होते.
बुटात लपवला मोबाइल, प्रश्नपत्रिका मिळताच सुरू झाला खेळ
परीक्षा सुरू असताना मनोज निवृत्ती वाघ (वय 30) याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पर्यवेक्षकांनी त्याच्यावर लक्ष ठेवले. त्यानंतर तपासणी केली असता परीक्षा कक्षात मोबाइल नेण्यास बंदी असतानाही त्याने मोबाइल फोन बुटात लपवून आणल्याचे आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.
विशेष म्हणजे, प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर त्याने मोबाइलच्या माध्यमातून Google वर प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रात सुरू असलेला हा ‘हायटेक कॉपी’चा प्रकार पर्यवेक्षकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला.
पर्यवेक्षकांनी रंगेहात पकडलं
मनोज वाघच्या हालचाली लक्षात आल्यानंतर पर्यवेक्षकांनी तातडीने मोबाइल ताब्यात घेतला. हॉल क्रमांक 11 मध्ये हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सहायक अधीक्षक तुषार वडघुले यांनी सरकारतर्फे 27 ऑगस्ट रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे मनोज निवृत्ती वाघ याच्याविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोलीस करीत आहेत.