पत्नी-वडिलांना ‘सॉरी’चा शेवटचा मेसेज; पहाटे गोदावरीत उडी, नाशिकमधील तरुणाच्या मृत्यूने खळबळ

पत्नी आणि वडिलांना ‘सॉरी’चा शेवटचा मेसेज पाठवल्यानंतर नाशिकमधील 32 वर्षीय शुभम पवार याने गोदावरी नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. दुपारी नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळला असून आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Suicide News

नाशिक : पत्नी आणि वडिलांना मोबाईलवर ‘सॉरी’ असा शेवटचा मेसेज पाठवला... त्यानंतर पहाटेच्या सुमारास घराबाहेर पडलेल्या 32 वर्षीय तरुणाने गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. दुपारी नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. शुभम मारुती पवार असे मृत तरुणाचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?

पेठरोड परिसरातील समर्थनगर येथे राहणारा शुभम पवार एका खासगी कंपनीत कामाला होता. बुधवारी (26 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास तो गोदा पार्कजवळ पोहोचला. यानंतर त्याने गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेतली.

नदीत उडी घेण्यापूर्वी शुभमने आपल्या पत्नीला आणि वडिलांना मोबाईलवर ‘सॉरी’ असा मेसेज पाठवला होता. हा मेसेज मिळाल्यानंतर कुटुंबीयांकडून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दुपारी नदीपात्रात मृतदेह आढळला

बुधवारी दुपारी गोदा पार्कजवळ गोदावरी नदीच्या पात्रात एक मृतदेह तरंगताना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

यानंतर पंचवटी पोलीस ठाण्याचे पथक, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. ओळख पटवल्यानंतर हा मृतदेह शुभम पवार यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

आत्महत्येमागचं कारण काय?

शुभमने एवढे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार संदीप बाविस्कर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

संपूर्ण घटनेमागचे नेमके कारण तपासातून समोर येणार आहे.

 

Inline Article Ad 728x90