नाशिकमध्ये प्रेमसंबंधाचा धक्कादायक शेवट! विवाहित प्रेयसीला कारखाली चिरडून हत्या; ‘अपघाताचा’ बनाव अखेर उघड

नाशिकच्या अंबड-सिडको परिसरातील 34 वर्षीय विवाहित महिलेची तिच्याच प्रियकराने कारने चिरडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाडीवऱ्हे परिसरातील एका रिसॉर्टच्या प्रवेशद्वारावर ही घटना घडली. आरोपीने पोलिसांना हा अपघात असल्याचे सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांच्या तपासात या घटनेमागील धक्कादायक सत्य समोर आले.

Crime News

नाशिक : नाशिकच्या सिडको परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेच्या हत्येने खळबळ उडाली आहे. दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या प्रियकरानेच रागाच्या भरात तिच्या अंगावर कार घालून तिला चिरडल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, हत्येनंतर आरोपीने पोलिसांसमोर ही घटना अपघात असल्याचा बनाव रचला. मात्र पोलिसांच्या तपासात हा बनाव उघडकीस आला आणि आरोपीला अटक करण्यात आली.

मृत महिलेचे नाव रूपाली नीलेश पाटील (वय 34) असून त्या अंबड येथील रहिवासी होत्या. तर अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दीपक सैंदाणे (वय 43) आहे.

दोन वर्षांच्या प्रेमसंबंधात वारंवार वाद

पोलिसांच्या माहितीनुसार, रूपाली पाटील सिडको परिसरातील एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये काम करत होत्या. आरोपी दीपक सैंदाणे त्यांच्याच इमारतीत शेजारी राहत होता. गेल्या दोन वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, दीपक आपल्याला पुरेसा वेळ देत नसल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे तपासात समोर आले आहे.

घटनेच्या दिवशी कंपनीच्या कामानिमित्त दोघे कारने वाडीवऱ्हे परिसरातील सांजेगाव येथील एका रिसॉर्टमध्ये जेवणासाठी गेले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान दीपकने कारमध्ये मद्यपान केले होते. रिसॉर्टमध्ये पोहोचल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि त्यांच्यात झटापटही झाली.

कारमधून उतरल्या अन् काही क्षणांतच घडले धक्कादायक

वाद वाढल्यानंतर रूपाली कारमधून उतरून रिसॉर्टच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने चालत निघाल्या. याच वेळी संतापलेल्या दीपकने कार वेगाने त्यांच्या दिशेने नेल्याचा आरोप आहे. कारची धडक बसून रूपाली कारखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपीने पोलिसांशी संपर्क साधत हा अपघात असल्याचे सांगितले. त्यामुळे सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

पोलिसांना संशय आला आणि ‘अपघाताचा’ बनाव उघडकीस आला

मात्र तपासादरम्यान पोलिसांना घटनेच्या परिस्थितीबाबत संशय निर्माण झाला. परिसरातील माहिती, उपलब्ध तांत्रिक पुरावे आणि आरोपीची चौकशी याआधारे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.

कसून चौकशी केल्यानंतर दीपकने रागाच्या भरात रूपाली यांच्या अंगावर कार घालून त्यांची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर वाडीवऱ्हे पोलिसांनी अकस्मात मृत्यूच्या नोंदीचे रूपांतर खुनाच्या गुन्ह्यात केले आणि दीपक सैंदाणे याला अटक केली.

रूपाली यांच्या पश्चात पती, सात वर्षांची मुलगी आणि सासू-सासरे असा परिवार आहे. या घटनेमुळे सिडको आणि अंबड परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपास वाडीवऱ्हे पोलीस करत आहेत.

Inline Article Ad 728x90