प्रेमाच्या नात्याचा भयानक शेवट! नेरुळ स्टेशनबाहेर प्रियकराचा चाकूहल्ला; 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू
नवी मुंबईतील नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर प्रेमसंबंधातील वादातून २१ वर्षीय तरुणीवर प्रियकराने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत असलेल्या सादिया शेखचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी नेरुळ पोलिसांनी आरोपी दानिश अन्सारीला काही तासांत अटक केली आहे.

नवी मुंबई : प्रेमसंबंधातील संशय आणि लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका २१ वर्षीय तरुणीची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली आहे. नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेरील बस थांब्यावर प्रियकराने तरुणीवर भरदिवसा प्राणघातक हल्ला केला. सादिया जाहिर शेख (वय २१) असे मृत तरुणीचे नाव असून, ती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत होती. या प्रकरणी नेरुळ पोलिसांनी आरोपी दानिश मोहम्मद अन्सारी (वय २७) याला अटक केली आहे.
नेरुळ स्टेशनबाहेर नेमकं काय घडलं?
मंगळवारी (२० ऑक्टोबर) सकाळी पावणेसातच्या सुमारास सादिया कामावर जाण्यासाठी नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेरील बस थांब्यावर उभी होती. त्यावेळी तिचा पाठलाग करत आलेल्या दानिशने तिच्याशी वाद घातला आणि चाकूने पाच ते सहा वार केले. या हल्ल्यात सादिया गंभीर जखमी झाली. हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
जखमी सादियाला सुरुवातीला नेरुळमधील रुग्णालयात, त्यानंतर वाशी महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने तिला मुंबईतील सायन रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, बुधवारी (२१ ऑक्टोबर) उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
चार वर्षांचे प्रेमसंबंध अन् लग्नावरून वाद
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, सादिया आणि दानिश यांच्यात गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, सादियाने लग्नास नकार दिल्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू होते. तसेच तिचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा दानिशला संशय होता. याच संशयातून त्याने सादियाला यापूर्वीही त्रास दिल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीविरोधात सादियाने यापूर्वी पोलिसांकडे तक्रारीही नोंदवल्या होत्या.
घणसोलीतून आरोपीला अटक
घटनेनंतर नेरुळ पोलिसांनी तांत्रिक तपास आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. घणसोली येथे नातेवाइकाच्या घरी लपलेल्या दानिशला अवघ्या काही तासांत अटक करण्यात आली. पोलिसांनी हल्ल्यात वापरलेला चाकूही जप्त केला आहे.
सादियाच्या मृत्यूनंतर आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून नेरुळ पोलीस पुढील तपास करत आहेत.