N.D. स्टुडिओचा कारभार सरकारकडे; आशिष शेलार अध्यक्ष, शूटिंगवर थेट 50% सूट
नितीन देसाईंच्या N.D. स्टुडिओची मालकी महाराष्ट्र सरकारकडे आली असून आशिष शेलार यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. 31 मार्च 2027 पर्यंत शूटिंग आणि इतर सुविधांवर 50% सवलत देण्यात येणार आहे.

मुंबई : दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या कर्जत-खालापूर येथील प्रसिद्ध N.D. स्टुडिओची मालकी आता महाराष्ट्र शासनाकडे आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजप नेते ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळांतर्गत स्टुडिओच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली.
या बैठकीत चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. 31 मार्च 2027 पर्यंत N.D. स्टुडिओमध्ये शूटिंग आणि इतर सुविधांसाठी 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे निर्माते, दिग्दर्शक आणि फिल्ममेकर्ससाठी हा निर्णय दिलासादायक मानला जात आहे.
नितीन देसाई यांच्या निधनानंतर स्टुडिओवरील आर्थिक कर्ज आणि भविष्यातील व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला होता. राज्य सरकारने आर्थिक देणी पूर्ण करून स्टुडिओचा ताबा घेतल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली. आता स्टुडिओची आर्थिक घडी व्यवस्थित करून त्याचा प्रभावीपणे विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
नव्या निर्णयानुसार N.D. स्टुडिओतील थीम पार्कचे प्रवेश शुल्क, चित्रीकरणासाठी उपलब्ध सुविधा आणि निर्माते, कलाकार, कलादिग्दर्शक व इतर मान्यवरांसाठीच्या निवास व्यवस्थेवर सवलत लागू होणार आहे. या माध्यमातून चित्रपट निर्मितीचा खर्च कमी करण्यासोबतच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण आकर्षित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
N.D. स्टुडिओचा वापर केवळ चित्रपट निर्मितीसाठी न करता सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्यासाठीही करण्याचे नियोजन आहे. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे आणि सर्वसमावेशक चित्रपट निर्मिती केंद्र म्हणून स्टुडिओ विकसित करण्याच्या दृष्टीने आगामी काळात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
राज्यात अधिकाधिक चित्रपटांचे चित्रीकरण झाले तर स्थानिक कलाकार, तंत्रज्ञ, कामगार आणि विविध सेवा क्षेत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी सरकारची भूमिका आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राला देशातील प्रमुख सिनेमा निर्मिती केंद्र म्हणून अधिक बळकटी देण्याचा उद्देश या निर्णयामागे आहे.
नितीन देसाई यांनी उभारलेला N.D. स्टुडिओ हा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या फिल्म शूटिंग लोकेशन्सपैकी एक आहे. आता शासनाच्या मालकीखाली या स्टुडिओला नव्या स्वरूपात विकसित करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने आगामी काळात येथे चित्रीकरणाला अधिक चालना मिळण्याची शक्यता आहे.