गुटखा तस्करीच्या खोट्या गुन्ह्याची धमकी; 90 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात
नाशिक जिल्ह्यातील पेठ पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार मनोज दगू गायकवाड याला चिकन व्यावसायिकाकडून 90 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. गुटखा तस्करीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आधी 60 हजार रुपये उकळल्यानंतर पुन्हा 1 लाखांची मागणी करण्यात आली होती. तक्रारदाराच्या तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
AI GENERATED

नाशिक : गुटखा तस्करीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत एका चिकन व्यावसायिकाकडून 90 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पेठ पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार मनोज दगू गायकवाड (वय 37) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे नाशिक ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे गुजरातमधील सुतारपाडा गावचे रहिवासी असून ते चिकन विक्रीचा व्यवसाय करतात. व्यवसायासाठी ते महाराष्ट्रातून कोंबड्यांची खरेदी करून गुजरातला वाहतूक करतात. जून महिन्यात कोंबड्यांची वाहतूक सुरू असताना वांगणी परिसरात संशयित पोलीस अंमलदार मनोज गायकवाड यांनी त्यांची गाडी अडवली. गाडीत कोंबड्या असल्याचे स्पष्ट दिसत असतानाही "तू गुटख्याची अवैध तस्करी करतोस, तुझ्यावर गुन्हा दाखल करतो," अशी धमकी देत त्यांनी तक्रारदाराकडून 60 हजार रुपये उकळल्याचा आरोप आहे.
यानंतर 5 जुलै 2026 रोजी गायकवाड यांनी पुन्हा तक्रारदाराशी संपर्क साधून भविष्यात कोंबड्यांच्या गाड्यांवर कोणतीही पोलीस कारवाई होऊ नये आणि वाहतूक सुरळीत सुरू राहावी यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागितली. अखेर दोघांमध्ये 90 हजार रुपयांवर तडजोड झाली.
सततच्या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने नाशिकमध्ये सापळा रचला. ठरल्याप्रमाणे 90 हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना मनोज गायकवाड याला रंगेहाथ पकडण्यात आले.
या प्रकरणी संशयित पोलीस अंमलदाराविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे. या कारवाईमुळे पोलीस दलातील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार समोर आला असून नाशिक ग्रामीण पोलीस वर्तुळात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे.