पिंपळवंडीतील चिमुकलीवर अत्याचारानंतर हत्या; निर्मनुष्य ठिकाणी नेमकं काय घडलं? संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायकल शिकवण्याचे आमिष दाखवून आरोपीने तिला घरापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील निर्मनुष्य ठिकाणी नेल्याचा आरोप आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको केला. आरोपीवर कठोर कारवाई करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी करण्यात आली आहे.

junnar rape case

पुणे : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

चिमुकलीला सायकल शिकायची होती. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपीने तिला “सायकल शिकवतो” असे सांगून घरापासून सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील निर्जन ठिकाणी नेल्याची माहिती समोर आली आहे. याच ठिकाणी तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

घटनास्थळ पाहून अंगावर काटा

या प्रकरणातील घटनास्थळ अत्यंत निर्मनुष्य आहे. एका बाजूला घनदाट उसाचे शेत, तर दुसऱ्या बाजूला ओढा असून परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे आणि शेती आहे. घटनास्थळापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर मुख्य रस्ता आहे. संबंधित शेतमालकही आठवड्यातून एखाद-दुसऱ्यावेळीच शेतात येत असल्याची माहिती आहे.

अशा निर्जन ठिकाणी चिमुकलीला नेल्यानंतर तिच्यासोबत नेमकं काय घडलं, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरोपीला अटक; ग्रामस्थ आक्रमक

या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. मात्र आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, प्रसंगी फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. पीडित चिमुकलीला न्याय मिळावा आणि आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

सुनेत्रा पवारांकडून तपासाचा आढावा

या घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला. प्रकरणाची पारदर्शक आणि सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी

“ही घटना अत्यंत निंदनीय असून माणुसकीला काळिमा फासणारी आहे. आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी, यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा,” अशी मागणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

पीडित कुटुंबाची लवकरच भेट घेऊन त्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याचा विश्वास देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेने पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून, आरोपीला कायद्याच्या चौकटीत कठोरात कठोर शिक्षा कधी मिळणार, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Inline Article Ad 728x90