पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक घटना! १८ व्या मजल्यावरून पडून आई-मुलाचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू

पिंपरी-चिंचवडमधील डांगे चौक परिसरातील सिग्नेचर पार्क सोसायटीमध्ये शुक्रवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली. १८ व्या मजल्यावरून पडल्याने एकता भांगड आणि त्यांचा सहा वर्षांचा मुलगा माधव यांचा मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Pune_Suicide_Case

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील डांगे चौक परिसरातील सिग्नेचर पार्क सोसायटीमध्ये शुक्रवारी (३० ऑक्टोबर) सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. सोसायटीच्या १८ व्या मजल्यावरून पडल्याने आई आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. एकता मनोज भांगड आणि माधव मनोज भांगड अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सिग्नेचर पार्क सोसायटीच्या इमारतीतून दोन जण खाली पडल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणीदरम्यान एक महिला आणि एका लहान मुलाचा मृतदेह आढळून आला.

प्राथमिक तपासात दोघेही इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून खाली पडल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर सोसायटी परिसरात एकच खळबळ उडाली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसले?

पोलिसांनी इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, एकता या मुलगा माधव याला सोबत घेऊन लिफ्टने १८ व्या मजल्यावर जाताना दिसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच १८ व्या मजल्यावरील गॅलरीजवळ दोघांच्या चपला आढळल्याचेही सांगण्यात येत आहे.

या प्राथमिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून घटनेचा तपास केला जात आहे. मात्र, घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

राजस्थानमधील भांगड कुटुंब पुण्यात वास्तव्यास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांगड कुटुंब मूळचे राजस्थानमधील आहे. मनोज भांगड हे येरवडा येथील आयटी कंपनीत नोकरीला आहेत. हे कुटुंब गेल्या दोन वर्षांपासून डांगे चौकातील सिग्नेचर पार्क सोसायटीमध्ये राहत होते.

शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे मनोज हे कामावर गेले होते. त्यावेळी घरी पत्नी एकता आणि मुलगा माधव उपस्थित होते. सायंकाळी घडलेल्या या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येत असून, सीसीटीव्ही फुटेजसह इतर पुराव्यांची तपासणी केली जात आहे.

दरम्यान, या घटनेमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.

Inline Article Ad 728x90