पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट; गोपीनाथ मुंडेंनंतर एकनाथ शिंदेंबाबतही चर्चेचा दावा, म्हणाले...

पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या जुन्या चर्चेचा खुलासा करताना एकनाथ शिंदे यांच्यासोबतही चर्चा झाल्याचं मान्य केलं आहे. मात्र शिंदेंसोबत नेमकी काय चर्चा झाली, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. मुंडेंनी काँग्रेस प्रवेश का नाकारला, याबाबतही चव्हाण यांनी महत्त्वाचा दावा केला.

Prithviraj Chavan

Ai Generated

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत केलेल्या दाव्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्याबाबतही महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, मात्र काही काँग्रेस नेत्यांनी त्यांचा प्रवेश रोखल्याचा दावा केला होता. यावर प्रतिक्रिया देताना चव्हाण यांनी “एकनाथ शिंदे आणि आमची चर्चा झाली होती; मात्र काय चर्चा झाली ते सांगणार नाही,” असं स्पष्ट केलं.

शिंदेंसोबत नेमकी काय चर्चा झाली?

हुसेन दलवाई यांच्या दाव्याबाबत विचारण्यात आलं असता पृथ्वीराज चव्हाण यांनी हा नवीन विषय असल्याचं सांगितलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक गाठीभेटी झाल्याचं त्यांनी मान्य केलं. मात्र त्या भेटींमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचा खुलासा करण्यास त्यांनी नकार दिला.

“एकनाथ शिंदे आमचे मित्र आहेत. ते आमचं काम करत नाहीत, मात्र आजही आमचे मित्र आहेत. ते आमच्या जिल्ह्यातले आहेत. आमच्या अनेक गाठीभेटी झाल्या आहेत. मात्र त्यावर मी बोलणार नाही,” असं चव्हाण यांनी म्हटलं.

गोपीनाथ मुंडेंना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर?

दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली. 13 ऑक्टोबरला गोपीनाथ मुंडे आणि आपली भेट झाली होती, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर 18 ऑक्टोबरला आपण दिल्लीला गेलो होतो आणि त्यावेळी मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाचा प्रस्ताव घेऊनच दिल्लीला गेल्याचा दावा त्यांनी केला.

या बैठकीला माणिकराव ठाकरे साक्षीदार असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. तसेच सोनिया गांधी आणि अहमद पटेल यांच्यासोबतही याबाबत बैठक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

मुंडेंनी प्रवेश का नाकारला?

पृथ्वीराज चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसकडून गोपीनाथ मुंडे यांना पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र मुंडेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास आपल्याला निवडणूक जिंकणं अवघड होईल, अशी भीती व्यक्त केली होती.

“नागपुरमधले दोघेजण मला खूप त्रास देतील,” असं गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याला सांगितल्याचा दावा चव्हाण यांनी केला.

लोकसभेत मुंडे उपनेते असताना सोनिया गांधींसह काँग्रेसमधील अनेकांना ते महाराष्ट्रातील मोठे ओबीसी नेते असल्याची जाणीव होती, असंही चव्हाण यांनी सांगितलं.

शिंदेंबाबतचा दावा आणि मुंडेंच्या प्रवेशाची जुनी चर्चा पुन्हा चर्चेत

गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील जुन्या राजकीय घडामोडींना पुन्हा उजाळा मिळाला आहे.

Inline Article Ad 728x90