पुण्यातून २०० कोटींचे संशयास्पद व्यवहार; २,१४३ कोटींच्या कथित आर्थिक घोटाळ्याची आयकर विभागाकडून चौकशी

बनावट प्रमाणपत्रे आणि शेल कंपन्यांच्या माध्यमातून झालेल्या कथित २,१४३ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासात पुण्याचे कनेक्शन समोर आले आहे. पुण्यातील एका खासगी बँकेच्या शाखेतून सुमारे २०० कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार परदेशात झाल्याचा संशय असून, आयकर विभागाकडून या व्यवहारांची चौकशी सुरू आहे.

income-tax.

पुणे : बनावट प्रमाणपत्रे, शेल कंपन्या आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून कथित २,१४३ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणात पुण्याचा संबंध समोर आला आहे. आयकर विभागाच्या तपासात पुण्यातील एका खासगी बँकेच्या शाखेतून सुमारे २०० कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार परदेशात वळवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

प्राथमिक तपासानुसार, बनावट तसेच शेल कंपन्यांशी संबंधित व्यवहारांच्या माध्यमातून ही रक्कम परदेशात हस्तांतरित झाल्याचे समोर आले आहे. या व्यवहारांची माहिती बँकेतील वरिष्ठ अधिकारी किंवा संचालक मंडळातील सदस्यांना होती का, याचाही तपास करण्यात येत आहे.

या प्रकरणाच्या तपासाला आयकर विभागाच्या तपास पथकाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर वेग आला आहे. चार्टर्ड अकाउंटंट श्याम कलानी यांची कथित आर्थिक नेटवर्कमधील भूमिका तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. कलानी यांनी उदगीर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे सांगण्यात येत आहे.

पुण्यातील बँक व्यवहार तपासाच्या केंद्रस्थानी

पुण्यातील संबंधित खासगी बँक शाखेतून झालेल्या कथित परदेशी व्यवहारांचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे. या व्यवहारांमध्ये पैसे नेमके कुठून आले, कुठे पाठवण्यात आले, कोणत्या कंपन्यांचा वापर करण्यात आला आणि हे व्यवहार करण्यासाठी कोणाची मदत घेण्यात आली, याचा तपास अधिकारी करत आहेत.

या व्यापक तपासात पुण्यासोबतच बंगळुरू, चंदीगड आणि दिल्ली-एनसीआर परिसरातील संशयास्पद बँक व्यवहारांचाही तपास केला जात आहे.

बनावट प्रमाणपत्रे आणि आर्थिक यंत्रणांचा कथित गैरवापर करून शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा संशय आहे. मात्र, या व्यवहारांचे नेमके स्वरूप, त्यामागील व्यक्ती आणि संस्थांची भूमिका तसेच कथित आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

श्याम कलानी यांच्या आत्मसमर्पणामुळे या कथित आर्थिक नेटवर्कबाबत तपास यंत्रणांना महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. बँक अधिकारी किंवा अन्य व्यक्तींची भूमिका असल्यास तीही पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.

Inline Article Ad 728x90