पुण्यात अपघात मृत्यू प्रकरणात १ कोटी १८ लाखांची नुकसानभरपाई; मोटार अपघात दावा प्राधिकरणाचा मोठा निर्णय

पुण्यात २०२३ मध्ये झालेल्या भीषण रस्ता अपघातात कर सल्लागार मकरंद जिंदे यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या नुकसानभरपाईच्या दाव्यावर सुनावणी करताना मोटार अपघात दावा प्राधिकरणाने १ कोटी १८ लाख १६ हजार ५५६ रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

accident

Ai Generate


पुणे : रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या कर सल्लागाराच्या कुटुंबीयांना तब्बल १ कोटी १८ लाख १६ हजार ५५६ रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश पुणे मोटार अपघात दावा प्राधिकरणाने दिले आहेत. मकरंद गोपाल जिंदे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी हा निर्णय देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल २०२३ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता मकरंद जिंदे हे जांभूळवाडी-शिवाजीनगर रोडवरून जात होते. ते शिवाजीनगर चौकाजवळ आले असता मागून भरधाव वेगाने आलेल्या सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, मकरंद जिंदे यांच्यावरून सिमेंट मिक्सर ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

कुटुंबीयांनी दाखल केला नुकसानभरपाईचा दावा

अपघातानंतर मकरंद जिंदे यांच्या पत्नी, आई आणि भावाने नुकसानभरपाईसाठी पुणे मोटार अपघात दावा प्राधिकरणात दावा दाखल केला. यासाठी त्यांनी अॅड. प्रमोद धुळे यांच्यामार्फत संबंधित सिमेंट मिक्सर ट्रकचे मालक आणि एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याविरोधात दावा दाखल केला होता.

मकरंद जिंदे हे मागील आठ वर्षांहून अधिक काळ कर सल्लागार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई आणि भाऊ असा परिवार आहे. हे कुटुंबीय त्यांच्या उत्पन्नावर अवलंबून असल्याचे दाव्यात नमूद करण्यात आले होते. मृत जिंदे यांचे वार्षिक उत्पन्न ९ लाख २१ हजार ७७४ रुपये असल्याचेही न्यायालयासमोर सादर करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांनी एकूण १ कोटी ४० लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली होती.

१ कोटी १८ लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश

अर्जदार आणि विमा कंपनीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद तसेच सादर करण्यात आलेले पुरावे विचारात घेतल्यानंतर मोटार अपघात दावा प्राधिकरणाचे सदस्य एस. आर. पवार यांनी कुटुंबीयांच्या बाजूने निर्णय दिला. प्राधिकरणाने मकरंद जिंदे यांच्या कुटुंबीयांना १ कोटी १८ लाख १६ हजार ५५६ रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात अॅड. प्रमोद धुळे यांना अॅड. अजिंक्य खैरे, अॅड. मनोज पवार आणि अॅड. मजहर मुजावर यांनी कायदेशीर कामकाजात सहकार्य केले.

Inline Article Ad 728x90