पुण्यात अक्कलकोटच्या कर्तृत्ववानांचा गौरव; चंद्रशेखर भांगे यांना ‘अक्कलकोट रत्न’ पुरस्कार
पुण्यात आयोजित ‘अक्कलकोट भूषण व रत्न पुरस्कार सोहळा २०२६’ मध्ये सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, उद्योग, प्रशासन, पोलीस आणि न्यायव्यवस्था यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १५ मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. लोकशाही न्यूजचे पुणे ब्युरो चंद्रशेखर भांगे यांना ‘अक्कलकोट रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले.
पुणे : शहरात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत अक्कलकोटचे नाव उज्ज्वल करणाऱ्या कर्तृत्ववानांचा गौरव करण्यात आला. गावगाथा मीडिया नेटवर्कच्या वतीने आयोजित ‘अक्कलकोट भूषण व रत्न पुरस्कार सोहळा २०२६’ शनिवारी स्वारगेट येथील नितू मांडके सभागृहात उत्साहात पार पडला.
अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, कला, उद्योग, प्रशासन, पोलीस, न्यायव्यवस्था आणि इतर क्षेत्रांत योगदान देणाऱ्या एकूण १५ मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
‘अक्कलकोट भूषण’ पुरस्काराने जन्मेजयराजे भोसले महाराज, मल्लिनाथ कलशेट्टी, माधव राजगुरू आणि शरणकुमार लिंबाळे यांचा गौरव करण्यात आला.
तर ‘अक्कलकोट रत्न’ पुरस्काराने लोकशाही न्यूजचे पुणे ब्युरो चंद्रशेखर भांगे, जिल्हा न्यायाधीश बंडोपंत कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहकार व साखर उद्योगातील रविकांत पाटील, अक्कलकोट तालुका पुणे रहिवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष विरभद्र हारकूड, उद्योजक गणेश फुलारी, छायाचित्रणकार संजीवकुमार हिळ्ळी, युवा उद्योजक सिद्धार्थ कापसे, मराठी भाषा व संतसाहित्य अभ्यासक डॉ. अमोगसिद्ध चेंडके आणि शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अॅड. सदाशिव माळगे यांचा सन्मान करण्यात आला.
गावगाथा मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक धोंडप्पा नंदे यांनी सांगितले की, पुण्यात वास्तव्यास असलेल्या अक्कलकोटच्या भूमिपुत्रांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे हा या पुरस्कार सोहळ्यामागील प्रमुख उद्देश आहे. यापुढे दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.