पुण्यात १६ ऑगस्टपासून ‘मराठी टेस्ट’; ऑटो-कॅबचालकांमध्ये खळबळ

पुण्यात ऑटोरिक्षा आणि कॅबचालकांसाठी मराठी भाषेचे कार्यकारी ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. १५ ऑगस्टनंतर अचानक तपासणी सुरू होणार असून, मराठी बोलता न येणाऱ्या चालकांवर नियमानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे.

auto riksha

पुणे : पुण्यातील ऑटोरिक्षा आणि कॅबचालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान आता अनिवार्य करण्यात आल्याने चालकांमध्ये धावपळ सुरू झाली आहे. पुणे आरटीओकडून मराठीचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले असून, १५ ऑगस्टनंतर अचानक तपासण्या सुरू होणार आहेत. मराठीतून प्रवाशांशी संवाद साधता न आल्यास संबंधित चालकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. पुणे आरटीओच्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांत सुमारे ७२० ऑटोरिक्षाचालकांनी मराठी भाषेचे प्रशिक्षण घेतले आहे. प्रवाशांशी संवाद साधणे, भाडे सांगणे, प्रवासाची माहिती देणे आणि मार्ग समजावून सांगणे यासाठी चालकांना प्राथमिक मराठी शिकवण्यात आली आहे.

मात्र, प्रशिक्षण घेतल्यानंतरही काही चालकांना मराठीतून प्रवाशांशी आत्मविश्वासाने संवाद साधण्याबाबत चिंता आहे. गेल्या २० वर्षांपासून ऑटोरिक्षा चालवणारे नूर आलम अन्सारी यांनीही मराठी शिकण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. पुणे आरटीओच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, पुण्यात सुमारे ४,००० ते ५,००० ऑटोरिक्षा आणि कॅबचालकांना मराठी अजिबात येत नाही. मात्र, मुंबईच्या तुलनेत पुण्यात ही संख्या कमी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आळंदी रोड येथील वाहन फिटनेस केंद्रात येणाऱ्या चालकांकडून त्यांच्या भाषेच्या ज्ञानाबाबत माहिती घेतली जाते. ज्यांना मराठी येत नाही, अशा चालकांना आरटीओकडून सुरू असलेल्या भाषा प्रशिक्षणासाठी पाठवले जात आहे. राज्य सरकारच्या निर्देशांनुसार १५ ऑगस्टनंतर वाहनचालकांची रँडम तपासणी सुरू होणार आहे. मराठी भाषेचे आवश्यक ज्ञान नसलेल्या चालकांवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशातून पुण्यात येऊन गेल्या पाच वर्षांपासून ऑटोरिक्षा चालवणाऱ्या एका चालकाने मराठी प्रशिक्षणावर नाराजी व्यक्त केली. सीएनजीसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा, वाहनांशी संबंधित अडचणी यांसारख्या प्रश्नांकडे सरकारने आधी लक्ष द्यावे, अशी त्याची भूमिका आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये सुधारणा करत ऑटोरिक्षाचालक, ॲपवर आधारित कॅबचालक आणि व्यावसायिक प्रवासी वाहनांच्या परवानाधारकांसाठी मराठी भाषेचे कार्यकारी ज्ञान अनिवार्य केले आहे.

पुणे आरटीओच्या कार्यक्षेत्रात १.४५ लाखांहून अधिक ऑटोरिक्षा आणि सुमारे ६३ हजार कॅब आहेत. त्यामुळे कॅबचालकांमध्येही मराठीची प्राथमिक वाक्ये शिकण्याची धावपळ सुरू झाली आहे. काही कॅबचालकांनी या निर्णयामुळे तणाव वाढल्याचे सांगितले. गेल्या पाच वर्षांपासून पुण्यात कॅब चालवणाऱ्या एका चालकाने मित्रांकडून मराठीतील मूलभूत वाक्ये शिकत असल्याचे सांगितले. तर दुसऱ्या एका कॅबचालकाने मराठीतील १५ ते २० प्राथमिक वाक्ये हिंदीत लिहून घेतली असून ती पाठ करत असल्याचे सांगितले. कारवाई टाळण्यासाठी शक्य तितक्या लवकर मराठी शिकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.


Inline Article Ad 728x90