बुधवार पेठेत खंडणीचा आरोप; फरासखाना पोलीस ठाण्यातील दोघांवर गुन्हा
पुण्यातील बुधवार पेठ परिसरात तरुणांना गुन्हा दाखल करण्याची आणि कोर्टात नेण्याची भीती दाखवून पैसे उकळल्याप्रकरणी दोन पोलिसांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. व्हायरल व्हिडिओच्या आधारे हे प्रकरण समोर आल्यानंतर विवेक पाटील आणि राहुल दाभाडे फरार झाल्याची माहिती आहे.

पुण्यातील बुधवार पेठ परिसरात तरुणांना अडवून त्यांना गुन्हा दाखल करण्याची आणि कोर्टात नेण्याची भीती दाखवत पैसे उकळल्याप्रकरणी दोन पोलिसांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमधून हे प्रकरण समोर आले.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिसांची नावे विवेक पाटील आणि राहुल दाभाडे अशी आहेत. गुन्हा नोंदवल्यानंतर हे दोघे फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.
व्हिडिओवरून उघड झाला प्रकार
हडपसरमधील तुपे वस्तीतील 24 वर्षीय तरुणाने फरासखाना पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार 29 जून रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास बुधवार पेठेतील एटीएम गल्ली परिसरात घडल्याचे सांगण्यात येते.
पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्हायरल व्हिडिओमध्ये पोलिसांकडून पैसे स्वीकारण्यात आल्याचे दिसून आले. तो व्हिडिओ लक्षात आल्यानंतर संबंधित तरुणांचा शोध घेण्यात आला आणि त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत दोन्ही पोलिसांनी पैसे घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात आला.
भीती दाखवून पैसे घेतल्याचा आरोप
फिर्यादी आणि त्याचा मित्र बुधवार पेठेत फिरत असताना विवेक पाटील आणि राहुल दाभाडे यांनी त्यांना थांबवले. “इथे काय करताय?” अशी विचारणा करत दोघांना घाबरवण्यात आले. त्यानंतर “तुमच्यावर केस होईल, कोर्टात जावे लागेल” अशी भीती दाखवून एका महिलेच्या स्कॅनरवरून 2000 रुपये घेतल्याचा आरोप आहे.
घाबरलेल्या तरुणांनी त्या क्षणी कोणालाही काही सांगितले नाही. मात्र व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण प्रकार उजेडात आला. त्यानंतर संबंधित तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास सुरू
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील करत आहेत. गेल्या वर्षभरापासून हे दोन्ही पोलीस फरासखाना पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहितीही समोर आली आहे.