राखी बांधण्यासाठी निघाली अन् काळाने बाप-लेकीला हिरावलं! चाकणजवळ भीषण अपघातात 14 वर्षीय मयुरीसह वडिलांचा मृत्यू
रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्यासाठी उत्साहाने निघालेल्या 14 वर्षीय मयुरी भोर आणि तिचे वडील राजेंद्र भोर यांचा चाकणजवळील वासुली परिसरात झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अवजड वाहनाच्या धडकेत मोटरसायकलवरील बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला, तर मयुरीची आई गंभीर जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे अवसरी आणि चाकण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वारंवार होणाऱ्या अपघातांवरून नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.
.jpg)
पुणे : रक्षाबंधनाचा आनंद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या भोर कुटुंबावर नियतीने काळाचा घाला घातला. आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथील 14 वर्षीय मयुरी भोर आणि तिचे वडील राजेंद्र भोर (वय 47) यांचा चाकणजवळ झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात मयुरीची आई गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र भोर हे पत्नी आणि मुलगी मयुरीसह मोटरसायकलवरून चाकणनजीकच्या वासुली परिसराकडे जात होते. याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका भरधाव अवजड वाहनाखाली त्यांची मोटरसायकल आली. अपघाताची तीव्रता एवढी होती की राजेंद्र भोर आणि त्यांची 14 वर्षीय मुलगी मयुरी यांचा जागीच मृत्यू झाला.
भावाला राखी बांधण्याचा प्रवास ठरला अखेरचा
रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या भावाच्या हातावर राखी बांधण्यासाठी मयुरी आनंदाने घराबाहेर पडली होती. मात्र, तिच्यासाठी हा प्रवास अखेरचा ठरला. रक्षाबंधनाच्या दिवशीच बाप-लेकीचा मृत्यू झाल्याने भोर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या हृदयद्रावक घटनेने अवसरीसह चाकण परिसरात शोककळा पसरली आहे.
चाकणमधील अपघातांच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर चाकण परिसरातील वाढत्या अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. परिसरातील वाहतूक व्यवस्था, रस्त्यांची स्थिती आणि अवजड वाहनांची वर्दळ याबाबत नागरिकांकडून वारंवार चिंता व्यक्त केली जात आहे. अपघातांची मालिका सुरू असतानाही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
“चाकण परिसरातील अपघात रोखण्यासाठी प्रशासन ठोस पाऊल कधी उचलणार?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.