पुण्यात पाच जणांकडून ४ पिस्तूल जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

पुणे गुन्हे शाखा युनिट-२ने सहकारनगर परिसरात कारवाई करत पाच संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४ पिस्तूल आणि ६ जिवंत काडतुसे, अशी सुमारे १ लाख ६१ हजार २०० रुपयांची शस्त्रे जप्त करण्यात आली. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहकारनगर पोलिस

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम सुरू आहे. याच अंतर्गत गुन्हे शाखा युनिट-२ने कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या शस्त्रांची एकूण किंमत सुमारे १ लाख ६१ हजार २०० रुपये आहे.

१३ ऑगस्ट रोजी गुन्हे प्रतिबंधक गस्त सुरू असताना पोलिस अंमलदार शिवानंद कायगुडे आणि उज्वल मोकाशी यांना गुप्त माहिती मिळाली. सहकारनगर परिसरातील वनशिव वस्ती येथे काही संशयित व्यक्ती थांबल्या असून त्यांच्याकडे शस्त्रे असल्याचे पोलिसांना समजले.

ही माहिती गुन्हे शाखा युनिट-२चे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांना देण्यात आली. त्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन कारवाई केली. यावेळी सुफियान बशीर शेख (२२), निलेश प्रभूलिंग कुंभार (२१), तुकाराम बाबासाहेब गवते (१९), ऋषभ ऊर्फ ऋषी शिवाजी भगत (२३) आणि अमित राजाराम पिलावरे (२५) यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्यांच्याकडून चार पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरोधात शस्त्र अधिनियम कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अपर पोलिस आयुक्त गुन्हे तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त गुन्हे गाईकवाड हसन आणि सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे आणि पोलिस निरीक्षक अविनाश माने यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने ही कारवाई केली.

या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलिस उपनिरीक्षक तेजश्री पवार, शिवानंद कायगुडे, उज्वल मोकाशी यांच्यासह गुन्हे शाखेतील इतर अधिकारी आणि पोलिस अंमलदार सहभागी झाले होते.

Inline Article Ad 728x90