वडिलांच्या खुनाचा बदला; २३ वर्षीय तरुणाने साथीदारांसह केला खून, चौघांना अटक
पुण्यातील शिंदेवाडी येथे झालेल्या खूनप्रकरणाचा ग्रामीण पोलिसांनी उलगडा करत चौघांना अटक केली. २०२३ मध्ये वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी २३ वर्षीय तरुणाने साथीदारांच्या मदतीने संजय कडू-देशमुख यांची हत्या केल्याची कबुली दिली असून आरोपींकडून देशी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

पुणे: पुणे-सातारा महामार्गावरील जुन्या कात्रज बोगद्याजवळील शिंदेवाडी परिसरात झालेल्या खूनप्रकरणाचा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उलगडा केला आहे. या प्रकरणात वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी २३ वर्षीय तरुणाने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०, रा. मुंढवा, मूळ रा. कुरण, ता. वेल्हे) असे आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मंथन दिनेश वैद्य, सौरभ सागर परदेशी, मिझान गौसउद्दीन शेख आणि संदीप बाबुलाल कोरी यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै रोजी शिंदेवाडी परिसरात संजय देशमुख यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या देशमुख यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर राजगड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) तसेच राजगड पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक माहिती आणि संशयितांच्या हालचालींचा बारकाईने मागोवा घेतला. त्यानंतर मंथन वैद्य आणि सौरभ परदेशी यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी मिझान शेख आणि संदीप कोरी यांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. पुढील कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून देशी बनावटीचे पिस्तूल तसेच तीन जिवंत काडतुसे जप्त केली.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये मंथन वैद्य यांच्या वडिलांचा खून संजय देशमुख यांनी केल्याचा आरोप होता. त्या घटनेचा राग मनात ठेवून वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मंथनने आपल्या साथीदारांसह संजय देशमुख यांची हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस करत असून आरोपींकडून आणखी काही माहिती मिळते का, तसेच या गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.