गणेशोत्सवातील DJ वाद पेटला; ‘डीजे वाजलाच पाहिजे’ म्हणणारे तरुण आक्रमक, तर विरोधकांचा प्रश्न – भक्ती की ध्वनिप्रदूषण?

पुण्यात गणेशोत्सवातील DJ आणि लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून वाद वाढला आहे. विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला काही नागरिकांचा पाठिंबा मिळत असताना तरुण आणि गणेश मंडळांकडून डीजेच्या समर्थनार्थ आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, ध्वनिप्रदूषण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना होणारा त्रास यामुळे डीजेला विरोध करणाऱ्यांचाही प्रश्न कायम आहे.

Vidyanand_ Bapat

पुणे : पुण्यातील गणेशोत्सवाची धूम सुरू असतानाच यंदा गणेशोत्सवातील डीजे आणि लाऊडस्पीकरच्या आवाजाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. नारायण पेठेतील रहिवासी विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सवातील वाढत्या आवाजाविरोधात भूमिका घेतल्यानंतर या विषयावर पुणेकरांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे.

डीजेच्या विरोधात काही नागरिकांनी आवाज उठवत ध्वनिप्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी आणि रुग्णांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा उपस्थित केला आहे. गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव असून त्याचे स्वरूप केवळ मोठ्या आवाजातील संगीत आणि डीजेपुरते मर्यादित राहू नये, अशी भूमिका डीजेविरोधकांकडून मांडली जात आहे.

दरम्यान, बापट यांच्या भूमिकेविरोधात काही तरुण आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ‘गणेशोत्सवात डीजे वाजलाच पाहिजे’, अशी भूमिका घेत पुणेकरांना गणेशोत्सव कसा साजरा करायचा, याचे धडे देऊ नयेत, अशी प्रतिक्रिया काही तरुणांनी दिली आहे. एवढा त्रास होत असेल तर पुणेकर वर्गणी काढून त्यांना अमेरिकेला पाठवतील, अशी उपरोधिक प्रतिक्रियाही समोर आली आहे.

मात्र, या वादाचा दुसरा पैलूही तितकाच महत्त्वाचा...

डीजेच्या समर्थनार्थ तरुणांकडून उत्साह, परंपरा आणि गणेशोत्सवातील जल्लोषाचा दाखला दिला जात असताना डीजेच्या प्रचंड आवाजामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर प्रश्न उपस्थित करणारे नागरिकही ठाम आहेत.

‘उत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे, पण त्यामुळे इतरांच्या शांततेवर गदा यायला नको’, अशी भूमिका विरोधकांकडून मांडली जात आहे. गणेशोत्सवातील पारंपरिक ढोल-ताशा, लेझीम, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देत उत्सवाचा आनंद घेता येऊ शकतो, मग डीजेचा कर्णकर्कश आवाजच का आवश्यक आहे?, असा सवालही केला जात आहे.

त्यामुळे पुण्यात सध्या प्रश्न केवळ ‘डीजे वाजवायचा की नाही?’ एवढाच राहिलेला नाही. उत्सवाचा जल्लोष आणि नागरिकांची शांतता यामध्ये समतोल कसा साधायचा? हा खरा मुद्दा बनला आहे.

एका बाजूला डीजेवर बंदी किंवा मर्यादा नको म्हणणारे तरुण, तर दुसऱ्या बाजूला ध्वनिप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे नागरिक... त्यामुळे आगामी दिवसांत पुण्याच्या गणेशोत्सवातील DJ वाद आणखी चिघळणार की प्रशासन यावर काही ठोस तोडगा काढणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Inline Article Ad 728x90