पुण्यात गणेशोत्सवाच्या स्पीकरवरून शिवसेना आक्रमक; ‘यंदा कोणतेही नवे निर्बंध नको’, पोलीस प्रशासनासमोर ठाम भूमिका

पुण्यात गणेशोत्सवाच्या ध्वनीव्यवस्थेवरील संभाव्य निर्बंधांवरून शिवसेना आक्रमक झाली आहे. यंदा स्पीकर आणि ध्वनिक्षेपकांवर नवे कठोर निर्बंध लागू करू नयेत, तसेच कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी गणेश मंडळांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाकडून चार बेस आणि चार टॉपच्या ध्वनीव्यवस्थेचा प्रस्ताव चर्चेत असल्याने अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pune News

 

पुणे  :गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ध्वनिक्षेपक आणि स्पीकरच्या निर्बंधांचा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीतील ध्वनीव्यवस्थेवर कठोर निर्बंध लादण्यास शिवसेनेने स्पष्ट विरोध दर्शवला असून, यंदाचा गणेशोत्सव कोणत्याही नव्या निर्बंधांशिवाय उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गणेशोत्सव आणि गणेश विसर्जनाच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी विसर्जन मिरवणुकीतील स्पीकर, ध्वनिक्षेपक, डेसिबल मर्यादा आणि ध्वनीव्यवस्थेला देण्यात येणाऱ्या परवानगीबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला शिवसेनेचे महाराष्ट्र सचिव तथा युवासेना नेते किरण साळी, शहर सचिव संदीप शिंदे, पुणे महानगर प्रमुख युवासेना हेमंत बागुल, लोकसभा अध्यक्ष अविनाश खेडेकर तसेच विशाल सरवदे उपस्थित होते.

‘स्पीकरवर बंदी मान्य नाही’; शिवसेनेची आक्रमक भूमिका

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असल्याचे सांगत शिवसेनेने गणेश मंडळांची बाजू प्रशासनासमोर ठामपणे मांडली. गणेशोत्सवाच्या उत्साहावर अनावश्यक निर्बंध लादू नयेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, पोलीस प्रशासनाने ध्वनिक्षेपकांवर संपूर्ण बंदी घालण्याचा कोणताही निर्णय नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, ध्वनीव्यवस्थेबाबत काही मर्यादा निश्चित करण्याचा विचार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्राथमिक स्वरूपात चार बेस आणि चार टॉप अशा ध्वनीव्यवस्थेला परवानगी देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

अंतिम निर्णयाआधी मंडळांना विश्वासात घ्या

ध्वनीव्यवस्थेबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी गणेश मंडळांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करावी, अशी मागणी शिवसेनेने केली. मंडळांच्या सूचना, अडचणी आणि प्रत्यक्ष मिरवणुकीतील गरजा समजून घेतल्यानंतरच नियम निश्चित करावेत, अशी भूमिका मांडण्यात आली.

भविष्यात ध्वनीव्यवस्थेबाबत SOP किंवा नवीन नियम तयार करायचे असल्यास ते गणेश मंडळांशी चर्चा करून पुढील वर्षापासून लागू करण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली.

यंदाचा गणेशोत्सव ‘निर्बंधमुक्त’ हवा

यंदाच्या गणेशोत्सवावर कोणतेही नवे निर्बंध लादू नयेत. गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुका पारंपरिक पद्धतीने, उत्साहात आणि गणेश मंडळांच्या सहभागाने पार पडू द्याव्यात, अशी शिवसेनेची ठाम भूमिका आहे.

गणेश मंडळे ही प्रशासनाची विरोधक नसून उत्सव आयोजनातील महत्त्वाची भागीदार आहेत. त्यामुळे प्रशासन आणि गणेश मंडळांमध्ये समन्वय ठेवूनच निर्णय घेतले जावेत, असा मुद्दाही शिवसेनेने बैठकीत मांडला.

आता पुणे पोलिसांकडून ध्वनीव्यवस्थेबाबत नेमका काय अंतिम निर्णय घेतला जातो आणि गणेश मंडळांच्या मागणीला कितपत मान्यता मिळते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे

Inline Article Ad 728x90