पुण्यात मुसळधार पावसाचा तडाखा; झाडे, फांद्या कोसळण्याच्या २८ घटना, सुदैवाने जीवितहानी नाही
पुणे शहरात 3 जुलैच्या रात्रीपासून 4 जुलैच्या सकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांत झाडे व मोठ्या फांद्या कोसळण्याच्या 28 घटना नोंदल्या गेल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहतूक आणि नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर परिणाम झाला.

पुणे , शहरात ३ जुलैच्या रात्रीपासून ते ४ जुलैच्या सकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या विविध भागांत झाडे आणि मोठ्या फांद्या कोसळण्याच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत. या घटनांमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला असून काही भागांत नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. प्राथमिक माहितीनुसार, या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही, मात्र प्रशासनाला तातडीने मदतकार्य राबवावे लागले.
सर्वाधिक घटना कोथरूड, येरवडा, शिवाजीनगर, सेनापती बापट रोड, बाणेर, कोरेगाव पार्क, चिंचवड आणि वारजे माळवाडी परिसरात घडल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दल आणि महापालिका प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून झाडे व फांद्या हटविण्याचे काम हाती घेतले.
वाकडेवाडीत झाड कोसळले; अनेक वाहनांचा चक्काचूर
वाकडेवाडीतील अंडी उबवणी केंद्राजवळ मोठे झाड अचानक कोसळल्याची घटना घडली. झाडाखाली उभ्या असलेल्या अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला.

सुदैवाने, झाड कोसळले त्यावेळी परिसरात नागरिकांची वर्दळ नसल्याने मोठी जीवितहानी टळली. घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
येरवडा परिसरात झाड कोसळल्याने वाहतूक प्रभावित
येरवडा परिसरातील महालेखा कार्यालयाजवळील मेरी सोसायटी परिसरात मोठे झाड कोसळल्याची घटना घडली. तसेच अन्य काही भागांतही झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या. यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.
शिवाजीनगर आणि वडगाव शेरीत रस्त्यांवर झाडे
शिवाजीनगरमधील मॉडेल कॉलनी परिसरात तसेच वडगाव शेरी रोडवर झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आणि प्रशासनाने तत्काळ कारवाई करून रस्ते मोकळे केले.
.jpeg)
कोथरूडमध्ये सर्वाधिक घटनांची नोंद
मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका कोथरूड परिसराला बसल्याचे दिसून आले. जयभवानी नगर, गोपाळ विहार, मेघा कॉलनी, करिष्मा सोसायटी, रिटीपार्क परिसर आणि इतर भागांमध्ये झाडे व फांद्या पडण्याच्या अनेक घटना नोंदविण्यात आल्या. काही ठिकाणी रस्त्यांवरील वाहतूक तात्पुरती विस्कळीत झाली.
.jpeg)
सेनापती बापट रोडवर झाड कोसळले
पुण्यात मुसळधार पावसामुळे शुक्रवारी रात्री उशिरा सेनापती बापट रस्त्यावरएक भलेमोठे झाड कोसळले , त्यामुळे उभ्या असलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आणि एका खासगी रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीचा काही भागही कोसळला. सुदैवाने, पालिकेच्या प्रशासनाने ढिगारा हटवला आणि कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.

बाणेर आणि वारजे माळवाडीत नागरिकांची गैरसोय
बाणेरमधील कुमार बंगला परिसर आणि प्रशांत सोसायटीजवळ, तसेच वारजे माळवाडीतील अभय कॉलनी परिसरात झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. या घटनांमुळे स्थानिक नागरिकांना काही काळ गैरसोयीचा सामना करावा लागला.
कोरेगाव पार्क, गणेश पेठ आणि चिंचवडमध्येही घटना
कोरेगाव पार्क लेन क्रमांक ५, गणेश पेठ पोलीस चौकी परिसर, तसेच चिंचवडमधील महाराष्ट्र बँकेजवळ झाडे कोसळल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या. संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
इतर प्रभावित भाग
याशिवाय पाषाण, नारायण पेठ, बिबवेवाडी, कोंढवा खुर्द, बालाजीनगर, टिळक रोड, कर्वे रोड, तळजाई परिसर आणि शहरातील इतर काही भागांतही झाडे व फांद्या पडल्याच्या घटना घडल्या.
जीवितहानी नाही; प्रशासन सतर्क
या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापतीची अधिकृत नोंद झालेली नाही. मात्र, पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका आणि आपत्कालीन यंत्रणांनी नागरिकांना मोठ्या झाडांखाली वाहन उभे न करण्याचे आणि आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांची छाटणी केल्याचा दावा करणाऱ्या पुणे महापालिकेच्या नियोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरात वारंवार झाडे कोसळण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांकडून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.