दहीहंडीचा उत्सव संपला अन् जुन्या सांगवीत अनर्थ; लोखंडी सांगाडा काढताना ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू
पुण्याच्या जुन्या सांगवी परिसरात दहीहंडी उत्सवानंतर लोखंडी सांगाडा हटवताना घडलेल्या दुर्घटनेत ४५ वर्षीय सलमा सलाउद्दीन पठाण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, मृत महिलेचा मुलगा संबंधित मंडळाशी जोडलेला असल्याने कुटुंबीयांनी मंडळाविरोधात तक्रार देण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे : दहीहंडीचा उत्सव संपल्यानंतर जल्लोषाच्या ठिकाणी अचानक शोककळा पसरली. पुण्याच्या जुन्या सांगवी परिसरात दहीहंडी उत्सवासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा हटवताना त्याचा काही भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव सलमा सलाउद्दीन पठाण असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री विघ्नहर्ता मंडळाचा दहीहंडी उत्सव संपल्यानंतर कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम सुरू होते. याचदरम्यान सांगाड्याचा एक भाग अचानक खाली कोसळला आणि तो सलमा पठाण यांच्या डोक्यावर आदळला.
या दुर्घटनेत सलमा पठाण गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेनंतर समोर आली धक्कादायक बाब
या दुर्घटनेनंतर कुटुंबीयांच्या भूमिकेमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. मृत सलमा पठाण यांचा मुलगा संबंधित दहीहंडी मंडळाशी जोडलेला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी मंडळाविरोधात पोलिसांत तक्रार देण्यास नकार दिल्याची माहिती आहे.
मंडळातील इतर मुलांना किंवा तरुणांना या घटनेमुळे अडचणींचा सामना करावा लागू नये, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करू नये, अशी विनंतीही कुटुंबीयांनी केल्याची माहिती समोर आली आहे.
उत्सवाच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
दहीहंडीचा उत्सव संपल्यानंतर लोखंडी सांगाडा हटवताना घडलेल्या या दुर्घटनेमुळे सार्वजनिक कार्यक्रमांसाठी उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या संरचनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जुन्या सांगवी परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून या प्रकरणाची पुढील प्रक्रिया केली जात आहे.