कात्रजमध्ये 5.79 कोटींचे एमडी जप्त; 'बेनी' नावाच्या नायजेरियन महिलेचा तपास सुरू

पुण्यातील कात्रज येथे 5.79 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त करत पोलिसांनी प्रशांत सावंत याला अटक केली. तपासात हे ड्रग्ज दिल्लीहून आणल्याचे उघड झाले असून, 'बेनी' नावाच्या नायजेरियन महिलेच्या सांगण्यावरून ते बंगळुरूला पोहोचवले जाणार होते. या प्रकरणामागील आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.

Pune Drug Racket Case Image

पुणे : पुण्यातील कात्रज परिसरातून 5 कोटी 79 लाख रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने हे ड्रग्ज दिल्लीहून आणल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. आरोपी हा 'बेनी' नावाच्या नायजेरियन महिलेच्या सांगण्यावरून हे ड्रग्ज बंगळुरूला घेऊन जात होता. मात्र, त्याआधीच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कात्रजमध्ये त्याला अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रशांत सुरेश सावंत (वय 38) आहे. त्याच्याकडून 2 किलो 895 ग्रॅम मेफेड्रॉन, एक मोबाईल आणि एक बॅग असा एकूण 5 कोटी 79 लाख 10 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंतचा 'बेनी' नावाच्या नायजेरियन महिलेशी संपर्क होता. ती त्याला फोनवरून ड्रग्ज कुठून घ्यायचे आणि कुठे पोहोचवायचे याच्या सूचना देत होती. तिच्या सांगण्यावरून सावंत दिल्लीला गेला. तिने दिलेल्या पत्त्यावर जाऊन त्याने एका निर्जन ठिकाणाहून ड्रग्जची बॅग घेतली.

ही बॅग बंगळुरूमध्ये पोहोचवायची होती. मात्र, प्रवासादरम्यान तो पुण्यातील कात्रज येथे उतरला. त्याचवेळी आधीपासून सापळा रचून बसलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला पकडले. तपासणीमध्ये त्याच्या बॅगेत मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज आढळून आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, सावंत यापूर्वी गोल्फ कोर्सवर 'कॅडी' म्हणून काम करत होता. त्यानंतर तो अमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी झाला. त्याच्याविरुद्ध पुणे आणि बंगळुरूमध्ये मिळून नऊ गुन्हे दाखल आहेत.

या प्रकरणामागे मोठे ड्रग्ज रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 'बेनी' आणि तिच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचा तपास सुरू आहे.

Inline Article Ad 728x90