"माझा थेट संबंध नाही, ही राजकीय सूडबुद्धी!" खलील शेख आत्महत्या प्रकरणी रवींद्र धंगेकरांचा पलटवार

पुणे: पुण्यातील गुलटेकडी परिसरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर खलील शेख (वय ६५) यांच्या आत्महत्येने पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खलील शेख यांनी आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ आणि सुसाईड नोटच्या आधारे स्वारगेट पोलिसांनी माजी आमदार आणि शिवसेना नेते रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, माजी नगरसेवक बाळा शेडगे यांच्यासह एकूण १४ जणांवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा (Abetment of Suicide) गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, स्वतः रवींद्र धंगेकर यांनी जाहीर प्रतिक्रिया दिली आहे, तर दुसरीकडे पुणे पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी चक्र फिरवली आहेत.

dhangekar image

नेमके काय आहे प्रकरण?

खलील शेख यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मात्र, आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी दोन चिठ्ठ्या लिहिल्या होत्या आणि एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी आरोप केला होता की, 'उत्कर्ष असोसिएट्स' कंपनीकडून त्यांचे ५० लाख रुपये येणे बाकी होते. हे पैसे न मिळाल्यामुळे ते प्रचंड आर्थिक विळख्यात आणि व्याजाच्या जाळ्यात अडकले होते. वारंवार मागणी करूनही रवींद्र धंगेकर आणि इतर भागीदारांनी त्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष केले आणि उलट त्यांना धमकावण्यात आले, ज्यामुळे नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची पहिली प्रतिक्रिया

गुन्हा दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला आहे. धंगेकर म्हणाले :-

"माझा खलील शेख यांच्याशी कोणताही वैयक्तिक किंवा थेट आर्थिक संबंध नव्हता. जे काही व्यवहार होते, ते केवळ कंपनीशी संबंधित होते. माझ्या पत्नीने (प्रतिभा धंगेकर) संबंधित कंपनीच्या भागीदारीतून २०२५ मध्येच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता आणि आम्ही कंपनीचे आर्थिक व्यवहार पाहत नव्हतो. मी आमदार झाल्यामुळे विरोधकांनी राजकीय आकस ठेवून या गृहप्रकल्पाच्या कामावर स्थगिती आणली. काम अचानक रखडल्यामुळे प्रकल्प कोलमडला आणि बँकेचे कर्ज थकले, ज्यामध्ये सर्वच भागीदार देशोधडीला लागले. हा गुन्हा पूर्णपणे राजकीय सूडबुद्धीने दाखल करण्यात आला आहे, आम्ही कायदेशीर प्रक्रियेचा आदर करून न्यायालयात आपली बाजू खंबीरपणे मांडू."

पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; डीसीपी मिलिंद मोहिते यांची माहिती

police dcp

या प्रकरणातील तपासाबाबत आणि हाय-प्रोफाईल आरोपींच्या अटकेबाबत परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त (DCP) मिलिंद मोहिते यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. डीसीपी मिलिंद मोहिते यांच्या माहितीनुसार:

"खलील शेख आत्महत्या प्रकरणी मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून आणि आत्महत्येपूर्वी मिळालेल्या चिठ्ठी व व्हिडिओच्या आधारे स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अनेक नामांकित लोकांचा समावेश आहे. स्वारगेट पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेच्या (Crime Branch) पोलिसांकडून गुन्हा दाखल झालेल्या सर्व आरोपींचा शोध घेण्यासाठी कसून तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांची विविध पथके आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली असून, सर्व बाजूंचा सखोल तपास करून कायद्यानुसार पुढील कडक कारवाई केली जाईल."

एफआयआर (FIR) मध्ये कोणाकोणाची नावे?

स्वारगेट पोलिसांनी दाखल केलेल्या या हाय-प्रोफाईल गुन्ह्यात खालील प्रमुख संशयित आरोपींची नावे समोर आली आहेत:

  • रवींद्र धंगेकर (माजी आमदार, कसबा पेठ)
  • प्रतिभा धंगेकर (रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी)
  • बाळासाहेब शेडगे (बाळा शेडगे) (माजी नगरसेवक)
  • वर्षा शेडगे (बाळासाहेब शेडगे यांच्या पत्नी)
  • विशाल केदारी
  • सुनील अय्यर
  • रघू गौडा
  • सुनील बोरा
  • राजन सेठिया
  • हमीद भाई शेख
  • शुभम

पुढील दिशा काय?

पुणे पोलिसांनी खलील शेख यांनी आत्महत्येसाठी वापरलेले पुरावे आणि सुसाईड नोट जप्त केली असून, ती पुढील तपासासाठी पाठवण्यात आली आहे. एका माजी आमदारावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर थेट गुन्हा दाखल झाल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली असून, गुन्हे शाखेचे पोलीस आता या आरोपींना कधी ताब्यात घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Inline Article Ad 728x90