‘DJ कितीही वाजू दे, पण माझी झोप नको बिघडवू!’ पुणेकरांचा Gen Z स्टाइलमध्ये आवाज
कर्णकर्कश DJ आणि लाऊडस्पीकरविरोधात पुणेकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. बालगंधर्व चौक ते पुणे महानगरपालिका असा मोर्चा काढत ध्वनीप्रदूषणावर कठोर निर्बंध, रिअल-टाइम डेटा आणि जबाबदार अधिकाऱ्यांची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाने आठवड्यात निर्णय न घेतल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे : दहीहंडीपासून गणेशोत्सवापर्यंत कर्णकर्कश आवाजाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ध्वनी पातळीवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणेकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. बालगंधर्व चौक ते पुणे महानगरपालिका असा मोर्चा काढत नागरिकांनी DJ आणि कर्णकर्कश लाऊडस्पीकरविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
नेमकं काय घडलं?
रविवारी, ६ सप्टेंबर रोजी बालगंधर्व चौकात मोर्चासाठी नागरिक जमण्यास सुरुवात झाली. अनेक नागरिक हातात प्लाकार्ड आणि बॅनर घेऊन सहभागी झाले होते. ‘आवाज बंद कर DJ, तुला पुणेकरांची शपथ हाय’ तसेच DJ बंदीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आंदोलनात केवळ गणेशोत्सव किंवा दहीहंडीपुरता प्रश्न मर्यादित न ठेवता धार्मिक, राजकीय आणि जातीय कार्यक्रमांमध्येही कर्णकर्कश स्पीकरवर बंदी आणावी, अशी मागणी करण्यात आली.
‘नागपूर, सोलापूर, मुंबईला बंदी होऊ शकते, मग पुण्यात का नाही?’
आंदोलकांनी प्रशासनाला थेट सवाल केला आहे. नागपूर, सोलापूर आणि मुंबईमध्ये ध्वनीप्रदूषणाविरोधात कारवाई होऊ शकते, तर पुण्यात कर्णकर्कश DJ आणि स्पीकरवर कठोर बंदी का लागू केली जात नाही? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
पोलिसांना निवेदन; प्रशासनासमोर ठेवल्या मोठ्या मागण्या
मोर्चाच्या शेवटी पुणे पोलिसांचे उपायुक्त रावले आणि सहआयुक्त अनुजा देशमाने यांना आंदोलनाच्या वतीने मुकुंद किर्दत यांनी निवेदन दिले.
या निवेदनात प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत—
- उत्सव सुरू होण्यापूर्वीच कर्णकर्कश DJ आणि स्पीकरला प्रतिबंध करावा.
- संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची नावे आणि फोन नंबर सार्वजनिक करावेत.
- ध्वनी पातळीचा रिअल-टाइम डेटा दररोज वेबसाइटवर प्रसिद्ध करावा.
- ध्वनीप्रदूषणाविरोधात झालेल्या कारवाईची माहिती सार्वजनिक करावी.
- कर्णकर्कश आवाजामुळे शारीरिक किंवा मानसिक नुकसान झाल्यास संबंधितांना भरपाई मिळावी.
- केवळ गणेशोत्सवच नव्हे, तर सर्व धार्मिक, राजकीय आणि जातीय कार्यक्रमांमध्ये कर्णकर्कश स्पीकरवर निर्बंध आणावेत.
‘निर्णय झाला नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरू’
येत्या आठवड्यात प्रशासनाकडून याबाबत ठोस निर्णय झाला नाही, तर पुणेकर पुन्हा रस्त्यावर उतरतील, असा इशारा मुकुंद किर्दत यांनी दिला.
विशेष म्हणजे, हे आंदोलन बिगरराजकीय असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. विविध संस्था-संघटना तसेच राजकीय पक्षांशी संबंधित कार्यकर्त्यांनीही पक्षीय भूमिका बाजूला ठेवून आंदोलनात सहभाग घेतला.
पुण्यात आता DJविरोधात मोठी मोहीम?
कर्णकर्कश DJ आणि लाऊडस्पीकरविरोधात पुणेकर मोठ्या प्रमाणावर एकवटत असल्याचे या मोर्चातून दिसून आले. सोशल मीडियावर ‘लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंच – PUNEKARS against LOUDspeakers’ या नावाने नागरिकांचा मोठा समूह तयार झाला असून, प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.