पुण्यात अमली पदार्थ रॅकेट उद्ध्वस्त! ऑपरेशन वज्रमध्ये दोन मुख्य तस्कर अटकेत

पुणे : पुण्यातील दिघी-भोसरी परिसरात मेफेड्रोन म्हणजेच एमडी या अमली पदार्थांची अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू असल्याचा मोठा खुलासा झाला आहे. मध्य प्रदेश केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने ‘ऑपरेशन वज्र’ अंतर्गत ही कारवाई करत राजस्थानातील जोधपूर आणि मध्य प्रदेशातील उज्जैन येथून दोन प्रमुख तस्करांना अटक केली आहे

drugs image

मिळालेल्या माहितीनुसार, 1 ते 10 जुलैदरम्यान राबवण्यात आलेल्या या मोहिमेत पुण्यातील औद्योगिक पट्ट्याला लागून असलेल्या दिघी-भोसरी परिसरात सुरू असलेल्या हायटेक एमडी निर्मितीच्या जाळ्याचा पर्दाफाश करण्यात आला. तपासादरम्यान या रॅकेटचा वापर करून अत्याधुनिक पद्धतीने अमली पदार्थ तयार केले जात असल्याचे समोर आले.

हायटेक लॅबचा पर्दाफाश

ही प्रयोगशाळा केवळ साध्या पद्धतीने नव्हे, तर प्रगत डिजिटल यंत्रसामग्रीच्या मदतीने चालवली जात होती, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. या ठिकाणाहून अमली पदार्थ निर्मितीसाठी वापरली जाणारी उपकरणे, विविध घातक रसायने आणि मोठ्या प्रमाणातील कच्चा माल जप्त करण्यात आला आहे.

निवासी आणि औद्योगिक भागाच्या सीमेलगत अशी प्रयोगशाळा सुरू असल्याने तपास यंत्रणाही चक्रावून गेल्या. या कारवाईमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ड्रग्ज नेटवर्क किती खोलवर पसरले होते, याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

दोन मुख्य तस्करांना अटक

‘ऑपरेशन वज्र’मध्ये रॅकेट चालवणाऱ्या दोन मुख्य आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. हे आरोपी राजस्थानातील जोधपूर आणि मध्य प्रदेशातील उज्जैन येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या सुरागांच्या आधारे सुरू केलेल्या तपासात या दोघांची भूमिका निर्णायक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

तपास पथकाने या रॅकेटच्या अन्य कनेक्शनचा शोधही सुरू केला असून, ही साखळी आंतरराज्यीय आहे की आंतरराष्ट्रीय, याचा तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणात आणखी कोण-कोण सामील आहे, याचा मागोवा घेतला जात आहे.

तपासाचा पुढचा टप्पा

पुणे हे आयटी आणि शिक्षणाचे मोठे केंद्र असल्याने तरुणांना लक्ष्य करण्यासाठी हा सारा नेटवर्क उभा करण्यात आला होता का, याचीही चौकशी सुरू आहे. सुरक्षा यंत्रणा आता या रॅकेटच्या आर्थिक व्यवहारांपासून ते पुरवठा साखळीपर्यंत सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

या कारवाईनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अमली पदार्थांशी संबंधित आणखी काही ठिकाणांची छाननी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘ऑपरेशन वज्र’मुळे पुण्यातील ड्रग्ज नेटवर्कवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे.

Inline Article Ad 728x90