केतन अग्रवाल हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा! मृत केतनच्या पैशातून दुसऱ्या महिलेला २ लाखांची अंगठी; चेतनचे 'डबल लाईफ' उघड?

पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात आर्थिक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि आरोपींचे इतर महिलांशी असलेले संबंध याबाबत नवे दावे समोर आले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सिया गोयलने लग्नासाठी घेतलेले पैसे चेतन चौधरीकडे गेले आणि काही रक्कम त्याने दुसऱ्या महिलेसाठी खर्च केल्याचा संशय आहे. डिलीट केलेले चॅट्स आणि डेटा पुन्हा मिळाल्याचा दावा असून, तपासात फसवणूक, आर्थिक लाभ आणि आधीपासूनचे संबंध हेच मुख्य कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

chetan issue

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात दररोज नवे धक्कादायक दावे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांच्याविरोधातील डिजिटल आणि आर्थिक पुराव्यांच्या तपासातून अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. तपासानुसार, सिया गोयलसोबत प्रेमसंबंधात असतानाच चेतन चौधरी इतर अनेक महिलांच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सिया गोयलने लग्नाच्या तयारीसाठी केतन अग्रवाल यांच्याकडून सुमारे एक कोटी रुपये घेतले होते. हे पैसे नंतर चेतन चौधरीच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याचा तपासातील दावा आहे. या आर्थिक व्यवहारांची चौकशी करताना पोलिसांना आणखी एक धक्कादायक बाब आढळली. तपासानुसार, चेतनने याच पैशांपैकी सुमारे दोन लाख रुपये खर्च करून दुसऱ्या एका महिलेसाठी महागडी अंगठी खरेदी केली होती.

सायबर फॉरेन्सिक तपासात चेतनच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा आणि चॅट्स पुन्हा मिळवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या तपासात तो सियासोबत नात्यात असतानाच इतर तीन-चार महिलांशी संपर्कात असल्याचे, त्यांच्यासोबत अश्लील स्वरूपाचे संदेश पाठवत असल्याचे, एका महिलेला भेटण्याची तयारी करत असल्याचे आणि आणखी एका महिलेशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.

या प्रकरणात सिया गोयलनेही पोलिसांसमोर नोंदवलेल्या जबाबात केतन अग्रवाल यांच्याबाबत काही वैयक्तिक दावे केल्याची माहिती आहे. मात्र, तपास यंत्रणांच्या मते, या गुन्ह्यामागील मुख्य हेतू आर्थिक लाभ, फसवणूक आणि आरोपींमधील आधीपासूनचे संबंध यांच्याशी संबंधित असल्याचा संशय आहे. या सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे.

दरम्यान, पोलिसांकडून बँक व्यवहार, मोबाईल डेटा, सोशल मीडिया चॅट्स आणि इतर डिजिटल पुरावे न्यायालयात सादर करण्यासाठी संकलित केले जात आहेत. या प्रकरणातील सर्व दावे हे पोलिस तपासावर आधारित असून, अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.

Inline Article Ad 728x90