पुण्यात नऱ्हे पोलिसांची मोठी कारवाई; चारचाकीतून दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त
पुण्यातील नऱ्हे पोलिसांनी गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंगदरम्यान बेनकर वस्ती परिसरात एका फार्च्युनर वाहनातून दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, वाहनासह एकूण ६ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे करीत आहेत.

पुणे : नऱ्हे पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने गुन्हे प्रतिबंधक कारवाईदरम्यान एका आलिशान चारचाकी वाहनातून दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, एकूण ६ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑगस्ट २०२६ रोजी नऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग सुरू होते. यावेळी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पारी कंपनी चौक ते उंबऱ्या गणपती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, बेनकर वस्ती परिसरातील अयोध्या प्युअर व्हेजजवळ पाहणी करण्यात आली.
यावेळी रस्त्याच्या कडेला MH 14 CK 0004 क्रमांकाची फार्च्युनर गाडी संशयास्पदरीत्या थांबलेली आढळली. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दोन व्यक्ती आढळून आल्या. चौकशीत त्यांची नावे शुभम ऊर्फ सोनू अनिल शिंदे (वय २६) आणि अथर्व ऊर्फ आप्पा उमाकांत सणस (वय २३) अशी असल्याचे समोर आले. पंचांसमक्ष दोघांची अंगझडती आणि वाहनाची झडती घेतली असता आर्मरेस्टजवळ एक पिस्तूल आणि त्याच्या मॅगझिनमध्ये एक जिवंत काडतूस आढळले. पोलिसांनी हे शस्त्र आणि काडतूस जप्त करत फार्च्युनर वाहनही ताब्यात घेतले.
त्यानंतर आरोपींच्या पोलीस कोठडीदरम्यान तांत्रिक तपास आणि चौकशीतून आणखी एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. अशाप्रकारे पोलिसांनी दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि वाहनासह एकूण ६ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे करीत आहेत.
ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) ईश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नऱ्हे पोलिसांच्या पथकाने केली.