पुण्यात भीषण अपघात! सीरम इन्स्टिट्यूटच्या मर्सिडीजखाली सापडून 41 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

पुण्यातील येरवडा गोल्फ क्लब चौकात 18 जून 2024 रोजी मर्सिडीज कारखाली सापडून कुरिअर कर्मचारी केदार चव्हाण (41) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पुण्याच्या मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने सीरम इन्स्टिट्यूट आणि विमा कंपनीला मृताच्या आईला 16.72 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

Pune Accidend

पुणे : पुण्यातील येरवडा परिसरातील गोल्फ क्लब चौकात मर्सिडीज कारखाली सापडून 41 वर्षीय कुरिअर कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. केदार मोहन चव्हाण असे मृत व्यक्तीचे नाव असून, हा अपघात 18 जून 2024 रोजी घडला होता. अपघातातील मर्सिडीज कार सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते.


केदार चव्हाण हे पुण्यातील पद्मावती परिसरातील रहिवासी होते. ते ईव्ही कुरिअर सर्व्हिसेसमध्ये डिलिव्हरी कर्मचारी म्हणून काम करत होते. अपघाताच्या दिवशी ते पार्सल पोहोचवण्यासाठी स्वारगेटहून पुणे विमानतळाच्या दिशेने दुचाकीवरून निघाले होते. येरवड्यातील गोल्फ क्लब चौकाजवळ पोहोचताच त्यांच्या दुचाकीचा तोल गेला आणि ते रस्त्यावर कोसळले.

याच वेळी पाठीमागून येणाऱ्या मर्सिडीज कारखाली ते सापडले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या चव्हाण यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी कार वेगात असल्याचे सांगितले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकी घसरल्यानंतर कार चव्हाण यांच्या अंगावरून गेल्याचे दिसून आले.

अपघातग्रस्त मर्सिडीज कारवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे स्टिकर होते. या प्रकरणात येरवडा पोलिसांनी कारचालक नंदू अर्जुन ढवळे याला ताब्यात घेतले होते. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. तसेच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.


दरम्यान, या अपघातप्रकरणी 22 ऑक्टोबर 2026 रोजी पुण्याच्या मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायाधिकरणाने कारचालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे नमूद करत सीरम इन्स्टिट्यूट आणि विमा कंपनीला केदार चव्हाण यांच्या आईला 16 लाख 72 हजार 210 रुपये नुकसानभरपाई, तसेच दावा दाखल केल्याच्या तारखेपासून वार्षिक 7 टक्के व्याज देण्याचे आदेश दिले आहेत.

या घटनेमुळे भरधाव वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांचा आणि रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


Inline Article Ad 728x90