श्रद्धेच्या नावाखाली धक्कादायक प्रकार; पुण्यात भोंदू बाबाविरोधात तक्रार
पुण्यात स्वतःला ‘गुरुवर्य’ म्हणवून घेणाऱ्या स्वप्नील लांडेविरोधात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून आणखी तक्रारी आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.

पुणे : नाशिकमधील भोंदू बाबाच्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच पुण्यातही स्वयंघोषित आध्यात्मिक गुरूविरोधात गंभीर तक्रार दाखल झाल्याचे समोर आले आहे. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून एका अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप स्वप्नील लांडे याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, स्वप्नील लांडे हा स्वतःला ‘गुरुवर्य’ म्हणून संबोधत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याने दैवी शक्ती आणि चमत्कारांचा दावा करत लोकांमध्ये प्रभाव निर्माण केल्याचा आरोप आहे.
याच दरम्यान, एका अल्पवयीन मुलीला जवळ बोलावून तिच्या कानात मंत्र म्हणण्याच्या बहाण्याने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, भविष्यात कोणतेही संकट आल्यास मदत करण्याचे आश्वासन देत तिच्यावर मानसिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद असल्याचे सांगण्यात येते.
या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. आरोपीने अशाच प्रकारे आणखी कोणाची फसवणूक किंवा गैरवर्तन केले आहे का, याचाही तपास केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासातून आणखी काही तक्रारी समोर येतात का, याकडे लक्ष लागले आहे.
अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकरणाचा सखोल तपास होणे महत्त्वाचे आहे. तसेच, धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेऊन फसवणूक किंवा गैरवर्तन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची गरज असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.