Pune Traffic: पुणेकरांनो, प्रवासाआधी लक्ष द्या! स्वारगेट-कात्रज मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत मोठे बदल; 'या' मार्गांवर वळण्यास बंदी

पुण्यातील स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे मार्केटयार्ड, पुष्पमंगल चौक आणि सातारा रोड परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. काही ठिकाणी उजवीकडे वळण्यास बंदी घालण्यात आली असून वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

Pune Traffic

पुणे : पुणेकरांसाठी वाहतुकीसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शहरातील स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे मार्केटयार्ड आणि परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. मेट्रोच्या कामादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी काही मार्गांवरील वळणांना बंदी घालत पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे या परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी बदललेले मार्ग लक्षात घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुष्पमंगल चौकात उजवीकडे वळण्यास बंदी

अप्पर बिबवेवाडीकडून चंद्रलोक चौकामार्गे पुष्पमंगल चौकात येणाऱ्या वाहनांना स्वारगेट, मार्केटयार्ड आणि उत्सव हॉटेलच्या दिशेने उजवीकडे वळण्यास बंदी घालण्यात आली आहे. या वाहनचालकांनी पुष्पमंगल चौकातून डावीकडे वळून तनिष्क शोरूमसमोरून अरणेश्वर बसस्टॉप येथे यू-टर्न घ्यावा आणि त्यानंतर स्वारगेटच्या दिशेने प्रवास करावा.

स्वारगेट ते कात्रज वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

स्वारगेटकडून पुणे-सातारा रोडमार्गे तसेच मार्केटयार्डकडून सातारा, कात्रज आणि बिबवेवाडीच्या दिशेने जाणारी वाहतूक वेलनेस मेडिकल स्टोअर आणि भापकर पेट्रोल पंपाजवळून पुष्पमंगल चौकामार्गे कात्रज व अप्पर बिबवेवाडीच्या दिशेने वळवण्यात आली आहे.

तसेच पुष्पमंगल चौकातून मार्केटयार्ड आणि उत्सव हॉटेल चौकाच्या दिशेने उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. उत्सव हॉटेल चौकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनाही उजवीकडे वळण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मार्केटयार्डमधून जाणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाची सूचना

मार्केटयार्डकडून येणाऱ्या वाहनचालकांनी वखार महामंडळ चौकामार्गे इच्छित स्थळी जावे. पर्याय म्हणून पुष्पमंगल चौक, तनिष्क शोरूम आणि अरणेश्वर बसस्टॉप येथून यू-टर्न घेऊन पुढील प्रवास करता येणार आहे.

वाहतूक पोलिसांचे पुणेकरांना आवाहन

स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे करण्यात आलेले हे बदल तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत. मार्केटयार्ड, बिबवेवाडी, स्वारगेट आणि सातारा रोड परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


स्वारगेट-कात्रज भूमिगत मेट्रोच्या कामामुळे पुण्यातील मार्केटयार्ड, पुष्पमंगल चौक आणि सातारा रोडवरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले असून काही चौकांमध्ये उजवीकडे वळण्यास बंदी घालण्यात आली आहे.


Inline Article Ad 728x90