पुण्यात मटणाच्या हट्टावरून वाद; रात्री घरात नेमकं काय घडलं? वडिलांकडून मुलाची हत्या, आईलाही अटक
पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात मटण बनवण्याच्या हट्टावरून झालेल्या वादाला हिंसक वळण लागले. दारूच्या नशेत घरी आलेल्या 30 वर्षीय मुलाची वडिलांनी मारहाण करून हत्या केल्याचा आरोप आहे. मुलाच्या मृत्यूनंतर आईने रक्ताचे डाग साफ करून घटनेचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आई-वडिलांना अटक केली आहे.
पुणे : मटणाच्या हट्टावरून सुरू झालेल्या वादाचा शेवट एका कुटुंबासाठी काळीज पिळवटून टाकणारा ठरला आहे. वारजे माळवाडीतील रामनगर परिसरात 24 ऑगस्टच्या रात्री 30 वर्षीय महेश भागवत गायकवाड याची त्याच्याच वडिलांनी मारहाण करून हत्या केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, मुलाच्या मृत्यूनंतरही प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, महेशला दारूचे व्यसन होते आणि तो कोणतेही काम करत नव्हता. यामुळे त्याच्या वैवाहिक आयुष्यातही अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच त्याचा पत्नीपासून घटस्फोट झाला होता. पत्नी दोन मुलांसह माहेरी गेल्यानंतर महेश एकटाच राहत होता.
जेवणासाठी तो शेजारी राहणाऱ्या आई-वडिलांकडे जात असे. सध्या श्रावण महिना असल्याने घरात मांसाहार केला जात नव्हता. मात्र, 24 ऑगस्टच्या रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत घरी आलेल्या महेशने मटणाचे कालवण बनवून देण्याचा हट्ट धरला.
मटण बनवणार नाही, असे आई-वडिलांनी सांगितल्यानंतर वाद वाढला. काही वेळातच या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, वडील भागवत सूर्यभान गायकवाड यांनी महेशच्या डोक्यावर आणि तोंडावर जोरदार मारहाण केली. यात महेशचा मृत्यू झाला.
यानंतर या घटनेला आणखी धक्कादायक वळण मिळाले. मुलाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर आई पार्वती भागवत गायकवाड हिने घटनेची माहिती बाहेर जाऊ नये यासाठी पतीला साथ दिल्याचा आरोप आहे. तिने घटनास्थळावरील रक्ताचे डाग साफ करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, महेशच्या मोठ्या भावाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी भागवत सूर्यभान गायकवाड (वय 64) आणि पार्वती भागवत गायकवाड (वय 60) या दोघांना अटक केली आहे.
वडिलांवर मुलाच्या हत्येचा, तर आईवर घटनेनंतर पुरावे नष्ट करण्यास मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वारजे माळवाडी पोलीस करत आहेत.