MPSC आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री; ‘मराठी मुलांच्या नोकरीसाठी कोणाचेही पाय धरायला तयार’, सरकारला थेट इशारा

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट देत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. “मराठी मुलांच्या नोकरीसाठी कोणाचेही पाय धरायला तयार आहे,” असे सांगत त्यांनी सरकारवर दबाव वाढवण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. 70 हजार पदांच्या मेगा भरतीच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणांवरही त्यांनी जोरदार टीका केली.

Raj_Thackrey

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध परीक्षांतील कथित गैरप्रकार, पेपरफुटी, रखडलेल्या भरती आणि विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरून पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली. आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

“मी इथे भाषण करायला नाही, तुमच्या रागात सहभागी व्हायला आलो आहे. हा राग तात्पुरता राहू देऊ नका,” असे आवाहन राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना केले. मराठी तरुणांच्या नोकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणाचेही पाय धरावे लागले तरी आपण तयार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘तुमचे पेपर फुटतात, आमची मतं फुटतात’

मुंबईतील मोर्चाचा संदर्भ देताना राज ठाकरे म्हणाले, “तुमच्याकडे पेपर फुटतात आणि आमच्याकडे मतं फुटतात. तुमच्या आयुष्यातील वर्षे जातात, तसे आमच्या आयुष्यातील पाच-पाच वर्षे निघून जातात. सध्या एकाच बाजूने ‘मन की बात’ सुरू आहे, दुसऱ्या बाजूच्या मनाचा विचारच केला जात नाही.”

स्पर्धा परीक्षांसाठी राज्याच्या विविध भागांतून पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची आर्थिक आणि मानसिक परिस्थिती समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक विद्यार्थी कर्ज काढून शिक्षण घेत आहेत, त्यांच्या कुटुंबांनी मोठ्या अपेक्षेने त्यांना पुण्यात पाठवले आहे, असेही ठाकरे म्हणाले.

‘70 हजारांची मेगा भरती होणार नाही’

राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या 70 हजार पदांच्या मेगा भरतीवरही राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “वस्तुस्थिती समजून घ्या. कुणाचेही सरकार आले तरी 70 हजारांची भरती होणार नाही,” असा दावा त्यांनी केला.

सरकारकडून मोठ्या प्रमाणावर खासगीकरण सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. सरकारी नोकऱ्या कमी होत असताना तरुणांना भरतीची आश्वासने दिली जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.

‘सरकारवर दबाव वाढला पाहिजे’

विद्यार्थ्यांनी आपला दबाव कायम ठेवावा, असे आवाहन करत राज ठाकरे म्हणाले, “तुमचे म्हणणे ऐकण्याची भीती सत्ताधाऱ्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. मी राजकारण करण्यासाठी इथे आलो नाही. तुमचे प्रश्न कुठल्याही मार्गाने सुटले पाहिजेत.”

मतदानाच्या वेळी पैसे, जेवणावळी आणि इतर प्रलोभनांना बळी न पडण्याचे आवाहनही त्यांनी तरुणांना केले. चुकीच्या लोकांना निवडून दिल्यानंतर न्याय मिळण्याची अपेक्षा ठेवणे कठीण होते, असेही त्यांनी नमूद केले.

मराठी तरुणांसाठी ठाम भूमिका

“महाराष्ट्रातील मराठी मुला-मुलींच्या नोकरीसाठी राज ठाकरेला कोणाचेही पाय धरावे लागले, तरी मी तयार आहे,” असे सांगत राज ठाकरे यांनी MPSC आंदोलक विद्यार्थ्यांना पूर्ण पाठिंबा दिला.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने तोडगा काढावा आणि आंदोलन अधिक चिघळण्याआधी निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


Inline Article Ad 728x90