'हा लोकशाहीचा खूनच!' ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवर राज ठाकरे संतापले; फडणवीसांना थेट आव्हान, 'निष्पक्षता सिद्ध करून दाखवा!'
मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणात भाजपवर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निष्पक्ष चौकशी आणि ठोस कारवाईची मागणी केली आहे. केवळ फॉरेन्सिक अहवालापुरते प्रकरण मर्यादित ठेवू नका, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी भाजपवर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला आहे. या कथित संभाषणातील प्रकार म्हणजे लोकशाहीचा खून असल्याची तीव्र टीका त्यांनी केली.
२९ मिनिटांच्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये 'फ्रेंडशिप फाईल' नावाच्या कथित ऑडिओ क्लिपचा उल्लेख केला आहे. सुमारे २९ मिनिटांच्या या क्लिपमध्ये ५०० कोटी रुपयांच्या व्यवहारासह माध्यमांवर दबाव आणणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनमत प्रभावित करणे आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्यांचा वापर करून नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याबाबत चर्चा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या कथित संभाषणात भाजपशी संबंधित व्यक्तींचा सहभाग असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला. मात्र, ऑडिओ क्लिपची सत्यता आणि त्यातील आर्थिक व्यवहारांचे दावे अद्याप स्वतंत्रपणे सिद्ध झालेले नाहीत.
'केवळ फॉरेन्सिकच्या नावाखाली महाराष्ट्राला गोल गोल फिरवू नका'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित ऑडिओ क्लिपच्या फॉरेन्सिक चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, या घोषणेवर राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. क्लिप खरी आहे की खोटी, एवढ्यापुरतीच चौकशी न करता त्यामधील कथित संभाषण आणि आरोपांचीही सखोल तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही किती निष्पक्ष आहात, हे प्रत्यक्ष कारवाईतून महाराष्ट्राला दाखवून द्या, असे आव्हानही राज ठाकरे यांनी फडणवीसांना दिले आहे.
दोन वर्षांपूर्वीची क्लिप आत्ताच बाहेर कशी आली?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही क्लिप अडीच वर्षांपूर्वीची असल्याचा उल्लेख करत ती आताच समोर आणण्यामागील हेतू काय, असा सवाल उपस्थित केला आहे. या प्रकरणाची संपूर्ण फॉरेन्सिक चौकशी करून सत्य बाहेर आणले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनीही ही क्लिप नेमकी कुणी बाहेर आणली आणि त्यामागे कोणते राजकीय गणित आहे, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
शिंदेसेनेकडूनही चौकशीची मागणी
या प्रकरणी शिंदेसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. कथित ऑडिओ क्लिपची सायबर आणि फॉरेन्सिक यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात यावी, तसेच भाजपने पक्षांतर्गत चौकशी करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले आहे.
५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहारापासून राजकीय रणनीतीपर्यंत अनेक गंभीर मुद्दे या प्रकरणातून पुढे आले आहेत. त्यामुळे आता चौकशीचा अहवाल आणि सरकारची पुढील भूमिका काय असणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.