एअर मार्शल जितेंद्र मिश्रा राम मंदिराचे पहिले CEO; तीन वर्षे सांभाळणार मंदिराच्या प्रशासनाची धुरा

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या व्यवस्थापनात मोठा बदल करण्यात आला आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची मंदिराचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे. तब्बल 5500 हून अधिक अर्जांमधून 18 उमेदवार शॉर्टलिस्ट करण्यात आल्यानंतर जितेंद्र मिश्रा यांची निवड झाली. कारगिल युद्ध आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या मिश्रा यांच्यासमोर आता राम मंदिराचा प्रशासकीय, आर्थिक आणि कायदेशीर कारभार अधिक पारदर्शकपणे हाताळण्याचे आव्हान असणार आहे.

Ram Temple_New CEO

अयोध्या : अयोध्येतील भव्य श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या व्यवस्थापनाबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. मंदिराच्या कारभाराला अधिक सक्षम आणि शिस्तबद्ध स्वरूप देण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मंदिराच्या इतिहासातील पहिल्या CEOची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे, या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी आता भारतीय हवाई दलातील एका अनुभवी अधिकाऱ्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची श्रीराम मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून निवड करण्यात आली आहे. नियुक्तीच्या दिवसापासून पुढील तीन वर्षे ते या पदावर कार्यरत राहणार आहेत. याच वर्षी एप्रिल महिन्यात ते भारतीय हवाई दलातून निवृत्त झाले होते.

कारगिल युद्धातील अनुभव आता राम मंदिराच्या सेवेत

जितेंद्र मिश्रा यांनी भारतीय हवाई दलात तब्बल 38 वर्षे सेवा बजावली आहे. लढाऊ विमान पायलट, कॉम्बॅट इन्स्ट्रक्टर आणि टेस्ट पायलट म्हणून त्यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. 1999 च्या कारगिल युद्धासह ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील रहिवासी असलेले मिश्रा हे NDA खडकवासलाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना 3 हजार तासांहून अधिक काळ लढाऊ विमान उडवण्याचा अनुभव आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना ‘सर्वोत्तम युद्ध सेवा मेडल’ ने सन्मानित करण्यात आले आहे.

5500 अर्ज... फक्त 18 नावं आणि अखेर मिश्रा यांची निवड!

राम मंदिराच्या CEO पदासाठी निवड प्रक्रिया अत्यंत चर्चेत राहिली. या पदासाठी तब्बल 5500 हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून केवळ 18 उमेदवारांची निवड करून त्यांची पुढील चाचणी घेण्यात आली.

उमेदवारांच्या खानपानाच्या सवयी, जीवनशैली तसेच हिंदू धर्माशी संबंधित विविध धार्मिक मान्यतांबाबत सखोल प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती आहे. या निवड प्रक्रियेसाठी ट्रस्टकडून निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोहली, विष्णुकांत चतुर्वेदी आणि सुरेश हावडे यांची तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.

नेमकी काय असेल CEO जितेंद्र मिश्रा यांची जबाबदारी?

राम मंदिराच्या CEO पदाची जबाबदारी केवळ प्रशासकीय कामकाजापुरती मर्यादित राहणार नाही. मंदिराचे प्रशासन, आर्थिक व्यवस्थापन, कायदेशीर बाबी, सुरक्षा, भाविकांच्या सुविधा आणि दैनंदिन कारभार यामध्ये CEOची महत्त्वाची भूमिका असणार आहे.

याशिवाय मंदिराच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखणे आणि वाढत्या भाविकांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापन अधिक सक्षम करणे हेही मोठे आव्हान असणार आहे.

दान चोरीच्या प्रकरणानंतर CEO पदाची गरज का भासली?

राम मंदिरातील दानाच्या चोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर ट्रस्टच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित झाले होते. जून-जुलै महिन्यात घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना अटक केली होती. त्यानंतर ट्रस्टच्या व्यवस्थापनातही महत्त्वाचे बदल झाले.

या पार्श्वभूमीवर राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी मंदिराच्या कारभारासाठी स्वतंत्र CEO पदाची गरज व्यक्त केली होती. आता अखेर या पदावर एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कारगिलच्या रणांगणापासून अयोध्येतील राम मंदिराच्या व्यवस्थापनापर्यंतचा त्यांचा प्रवास आता चर्चेचा विषय ठरला आहे. पुढील तीन वर्षांत ते राम मंदिराच्या कारभारात कोणते बदल घडवून आणतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Inline Article Ad 728x90