सोशल मीडियावरील अश्लील आणि बदनामीकारक कमेंट्स; रुपाली चाकणकर यांच्या तक्रारीनंतर अनेकांविरोधात गुन्हा

रुपाली चाकणकर यांच्याबाबत सोशल मीडियावर खोटी, अश्लील आणि बदनामीकारक माहिती प्रसारित केल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब आणि ट्विटरवरील काही अकाउंट्सचा तक्रारीत उल्लेख असून, पुणे पोलिसांनी 21 ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदवला आहे.

Rupali Chakankar

पुणे : माजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली निलेश चाकणकर यांच्याबाबत सोशल मीडियावर खोटी, दिशाभूल करणारी, अश्लील आणि बदनामीकारक माहिती प्रसारित केल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चाकणकर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर 21 ऑगस्ट 2026 रोजी ही कारवाई करण्यात आली.

सोशल मीडियावरील पोस्टमधून आरोप

चाकणकर यांच्या तक्रारीनुसार, 18 मार्च 2026 रोजी अशोक एकनाथ खरात याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांतून समोर आल्यानंतर काही सोशल मीडिया अकाउंट्सवरून चाकणकर यांच्यासोबत सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये काढण्यात आलेले फोटो आणि व्हिडीओ प्रसारित करण्यात आले. या पोस्टच्या माध्यमातून त्यांच्याबाबत विविध आरोप करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूबवरील अकाउंट्सचा उल्लेख

तक्रारीत फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब आणि ट्विटरवरील काही अकाउंट्सचा उल्लेख करण्यात आला आहे. या अकाउंट्सवर करण्यात आलेल्या पोस्टखाली काही व्यक्तींनी अश्लील, अपमानास्पद आणि बदनामीकारक कमेंट्स केल्याचा आरोप चाकणकर यांनी केला आहे.

मानसिक त्रास आणि सामाजिक प्रतिष्ठेला धक्का

या प्रकारामुळे आपली सामाजिक प्रतिष्ठा मलीन झाली असून मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे चाकणकर यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. संबंधित सोशल मीडिया पोस्ट, कमेंट्स, स्क्रीनशॉट आणि इतर कागदपत्रे पोलिसांकडे पुरावा म्हणून सादर करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

या तक्रारीच्या आधारे पुणे शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Inline Article Ad 728x90