साताऱ्यात हृदयद्रावक घटना! अपघातात जवळच्या मित्राचा मृत्यू; काही दिवसांतच विद्यार्थिनीनेही संपवलं आयुष्य

साताऱ्यातील यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या वसतिगृहात 19 वर्षीय पूजा माने या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कराडजवळील भीषण अपघातात तिचा जवळचा मित्र सुयश चिंचकर याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पूजा मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत असून, तिच्या मृत्यूमागील नेमक्या कारणाचा पोलीस तपास करत आहेत.

Satara_Suicide_Case

सातारा : साताऱ्यातील यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या वसतिगृहात एका 19 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. पूजा माने असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, ती खटाव तालुक्यातील मानेवाडी येथील रहिवासी होती. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजाचा जवळचा मित्र सुयश चिंचकर याचा काही दिवसांपूर्वी कराडजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. सुयश आपल्या मित्रांसोबत कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन परतत असताना त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीचा ट्रकसोबत अपघात झाला होता. या दुर्घटनेत चार तरुणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले होते.

मित्राच्या निधनानंतर पूजा मानसिक तणावात?

सुयशच्या अचानक झालेल्या निधनामुळे पूजाला मोठा मानसिक धक्का बसल्याचे तिच्या जवळच्या व्यक्तींकडून सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर ती मानसिक तणावाखाली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, गुरुवारी (22 ऑक्टोबर) साताऱ्यातील वसतिगृहात तिचा मृतदेह आढळून आला. मात्र, तिच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कराडजवळील अपघातात चार मित्रांचा मृत्यू

कराड शहराजवळ पुणे-बेंगळुरू महामार्गावरील उड्डाणपुलावर रविवारी रात्री सुमारे 11 वाजता स्कॉर्पिओ आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत तेजस देशमुख (25), सागर निंबाळकर (23), सुयश चिंचकर (20) आणि रोहित धोत्रे (21) या चार तरुणांचा मृत्यू झाला होता. तर ऋतुराज दुबळे (21), शंतनू शिंगाडे (20) आणि अमन तांबोळी (23) हे तिघे जखमी झाले होते.

अपघातातील सर्व तरुण खटाव तालुक्यातील कातरखटाव परिसरातील रहिवासी होते. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली होती.

सातारा तालुका पोलिसांकडून तपास सुरू

पूजाच्या मृत्यूची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तिचा मोबाईल तपासासाठी ताब्यात घेण्यात आला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणाची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस सर्व शक्यता तपासत असून, पुढील तपासानंतर मृत्यूमागील नेमकी परिस्थिती स्पष्ट होणार आहे.

Inline Article Ad 728x90