साठ्ये कॉलेजच्या गेटबाहेर मनसे विद्यार्थी सेना आणि ABVP आमनेसामने; सदस्य नोंदणीच्या वादातून तुफान हाणामारी
मुंबईतील विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर सदस्य नोंदणी मोहिमेवरून मनसे विद्यार्थी सेना आणि ABVP कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई : विलेपार्ले पूर्व येथील प्रसिद्ध साठ्ये कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर गुरुवारी मनसे विद्यार्थी सेना (MNVS) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. नवीन विद्यार्थ्यांच्या सदस्य नोंदणी मोहिमेवरून सुरू झालेला वाद काही वेळातच हाणामारीपर्यंत पोहोचला. त्यामुळे कॉलेज परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला.
मनसे विद्यार्थी सेनेकडून गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील विविध महाविद्यालयांबाहेर सदस्य नोंदणी मोहीम राबवली जात आहे. गुरुवारी साठ्ये कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर मनसे आणि ABVP या दोन्ही संघटनांचे स्टॉल लावण्यात आले होते. याचवेळी स्टॉलच्या जागेवरून आणि विद्यार्थ्यांच्या सदस्य नोंदणीवरून दोन्ही गटांमध्ये वादाला सुरुवात झाल्याची माहिती आहे.
नेमका वाद कशावरून झाला?
मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी ABVP कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत. कॉलेजमध्ये ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना कथितरित्या बळजबरीने थांबवून सदस्य नोंदणी केली जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. तसेच, विद्यार्थिनींना हात धरून जबरदस्तीने नेले जात असल्याचाही दावा मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे.
दरम्यान, या आरोपांवरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद वाढला आणि काही वेळातच परिस्थिती हाताबाहेर गेली. दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. या घटनेमुळे कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर मोठी गर्दी जमा झाली.
पोलिसांची घटनास्थळी धाव
हाणामारीची माहिती मिळताच विलेपार्ले पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या कॉलेज परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, सदस्य नोंदणीच्या एका छोट्याशा वादाचे रूप थेट हाणामारीत कसे बदलले आणि या प्रकरणात नेमकी कायदेशीर कारवाई कोणावर होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.