केतन अग्रवाल यांचे आजोबा देविचंद अग्रवाल यांचे निधन; कुटुंबावर दुःखाच डोंगर
लोणावळ्यातील लोहगड येथे झालेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेल्या अग्रवाल कुटुंबावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. केतन अग्रवाल यांचे आजोबा देविचंद अग्रवाल यांचे शुक्रवारी निधन झाले. नातवाच्या निधनाच्या धक्क्यातून ते सावरू शकले नाहीत, अशी माहिती कुटुंबीयांच्या जवळच्या सूत्रांकडून समोर आली आहे.

पुणे : अलीकडेच झालेल्या केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या घटनेने संपूर्ण कुटुंब हादरले होते. सुरुवातीला अपघात मानल्या गेलेल्या या प्रकरणाला नंतर वेगळे वळण मिळाले आणि त्यानंतर सुरू झालेल्या तपासामुळे राज्यभरात मोठी चर्चा झाली. या सर्व घटनांमुळे अग्रवाल कुटुंब प्रचंड मानसिक तणावाखाली होते. अशातच कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य असलेल्या देविचंद अग्रवाल यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने नातेवाईक आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, केतन यांच्या निधनानंतर देविचंद अग्रवाल यांची प्रकृती खालावली होती. नातवाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे ते मानसिकदृष्ट्या खूप व्यथित झाले होते. अखेर शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे अग्रवाल कुटुंबावर सलग दुसऱ्यांदा दुःखाचा आघात झाला आहे.
देविचंद अग्रवाल हे कुटुंबातील ज्येष्ठ आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. सध्या अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या कठीण प्रसंगात अनेकजण त्यांना धीर देण्यासाठी पुढे येत आहेत. दरम्यान, केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असून, या प्रकरणातील विविध पैलूंवर तपास यंत्रणा सखोल चौकशी करत आहे. या पार्श्वभूमीवर अग्रवाल कुटुंबाला बसलेला हा आणखी एक धक्का अत्यंत वेदनादायी मानला जात आहे.