पुण्यात FDAचा धडक छापा; सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानाला 'स्टॉप बिझनेस' नोटीस

केतन अग्रवाल हत्याकांडातील मुख्य आरोपी सिया गोयलच्या वडिलांच्या पुण्यातील 'मेसर्स बी. जी. गोयल अँड कंपनी' या दुकानावर FDAने धडक कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने 'स्टॉप बिझनेस नोटीस' बजावण्यात आली असून ८.१४ लाख रुपये किमतीचा ४,१७२ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. मात्र, ही कारवाई अन्न सुरक्षा नियमांअंतर्गत करण्यात आली असून तिचा केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासाशी थेट संबंध नसल्याचे FDAने स्पष्ट केले आहे.

siya goyal father shop

पुणे : केतन अग्रवाल हत्याकांडातील मुख्य आरोपी सिया गोयलच्या कुटुंबाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात असलेल्या तिचे वडील प्रवीण गोयल यांच्या 'मेसर्स बी. जी. गोयल अँड कंपनी' या घाऊक अन्नधान्य विक्री करणाऱ्या दुकानावर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने मोठी कारवाई केली आहे. नियमित तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यानंतर अधिकाऱ्यांनी दुकानाला 'स्टॉप बिझनेस नोटीस' बजावली. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत दुकानातील सर्व व्यावसायिक व्यवहार तातडीने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

FDAच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत दुकानात साठवून ठेवलेल्या विविध खाद्यपदार्थांच्या नमुन्यांची आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर अधिकाऱ्यांनी सुमारे ४,१७२ किलो अन्नसाठा जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत ८ लाख १४ हजार ६३० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये हळद पावडर, तीळ, सोया मिनी चंक्स तसेच इतर खाद्यपदार्थांचा समावेश आहे.

दरम्यान, केतन अग्रवाल हत्याकांडाचा तपास सुरू असतानाच आरोपीच्या कुटुंबाच्या व्यवसायावर झालेल्या या कारवाईमुळे शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या कारवाईचा संबंध हत्याकांडाशी जोडला जात असला तरी FDAने याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई केवळ अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत करण्यात आली असून तिचा केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासाशी कोणताही थेट संबंध नाही. संबंधित आस्थापनामध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यामुळेच नियमानुसार ही प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.

सध्या केतन अग्रवाल हत्याकांडाचा तपास स्वतंत्रपणे सुरू असून दुसरीकडे FDAकडून अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर राज्यभरात कारवाईचा धडाका सुरू आहे. अशा परिस्थितीत सिया गोयलच्या कुटुंबाच्या व्यवसायावर झालेल्या या कारवाईमुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

Inline Article Ad 728x90